– तब्बल ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी देणार सांस्कृतिक कलाविष्कारांना रंगत.
सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे उत्साहात रंगणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि मुंबई विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह उपस्थित होते.
या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला या विभागांतील विविध स्पर्धा होणार आहेत. गायन, वाद्यवादन, लोकनृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, मिमिक्री, चित्रकला, रांगोळी, पोस्टर निर्मिती, कोलाज आणि मातीशिल्प अशा विविध कलाप्रकारांतून विद्यार्थी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा प्रतिष्ठेचा उपक्रम आहे. सिंधुदुर्ग विभागीय फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी व कागदपत्र पडताळणी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून करण्यात येणार आहे. मुख्य स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते रात्री ९.३० या वेळेत पार पडतील. याशिवाय मराठी, हिंदी व इंग्रजी कथा लेखन तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.
युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक आणि डॉ. नितीन वळंजू यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या कार्यरत असून, महोत्सवाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
एकाच छताखाली संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि कलेचा बहारदार आविष्कार अनुभवण्याची संधी सावंतवाडीकरांना मिळणार असल्याने युवा महोत्सवाकडे जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक आणि कला रसिकांचे लक्ष लागले आहे.



