‘मोरजकर’ माय-लेकाचा काव्यवाचनात डंका! ; बांदा येथील स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेत नैतिक, रीना मोरजकर अव्वल.

बांदा : नट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष शांताराम मोर्ये यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेत मोरजकर माय-लेकाने आपल्या प्रतिभेची छाप उमटवत दुहेरी यश संपादन केले. लहान गटात नैतिक मोरजकर याने प्रथम क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटात त्याच्या आई सौ. रीना मोरजकर यांनीही प्रथम क्रमांक मिळवत स्पर्धेत मानाचा झेंडा रोवला.

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १७ स्पर्धकांनी सहभाग घेत विविध विषयांवरील स्वरचित पावसाळी कविता सादर केल्या.

स्पर्धेच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसारकर, सुगंधा मोर्ये, तसेच परीक्षक कवी हरीशचंद्र भिसे व कवयित्री सौ. शमिका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर (कै.) सुभाष मोर्ये यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत संचालक जगन्नाथ सातोस्कर यांनी केले, तर प्रास्ताविक सचिव राकेश केसारकर यांनी केले.

यावेळी सुगंधा मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर व अन्वर खान यांनी मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

लहान गटातील निकाल :
प्रथम – नैतिक मोरजकर (खेमराज हायस्कूल, बांदा)
द्वितीय – गौरी गावडे (मडुरा)
तृतीय – सिया नाईक (माजगाव)

तर तेजश्री धुरीसार्थक राणे (न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

मोठ्या गटातील निकाल :
प्रथम – सौ. रीना मोरजकर (बांदा)
द्वितीय – शिवाजी पोपकर (इन्सुली)
तृतीय – रामचंद्र शिरोडकर (तळकट)

तर जागृती पंडित (कास) व सौ. नेत्रा राणे (इन्सुली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात सौ. अर्चना सावंत, सौ. शुभेच्छा सावंत, माधवी गाड, विहान गावस, जगन्नाथ सातोस्कर, परीक्षक सौ. शमिका नाईक व कवी हरीशचंद्र भिसे आदींनीही कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी अनंत भाटे, गुरुनाथ नार्वेकर, राजन गावडे, पूजा धुरी, नीता कामत, सौ. सुवर्णलता धारगळकर, भक्ती साळगावकर, सौ. सुनीता चिंदरकर, जे. डी. पाटील, सुनील नातू, सौ. शिरोडकर, आशिष तांडुळे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक तसेच वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

मोरजकर माय-लेकाच्या या दुहेरी यशामुळे साहित्य क्षेत्रात त्यांच्या काव्यप्रतिभेचे विशेष कौतुक होत असून, स्पर्धेच्या निमित्ताने नवोदित कवींना व्यासपीठ मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles