सावंतवाडी : विकास सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक संस्थेला व्यवस्थापन खर्चासाठी दरवर्षी २० हजार रुपये, सचिवांसाठी मेडिक्लेम विमा तसेच उत्तम कर्जवसुलीसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी दिली.
सावंतवाडी येथील मंगिरीश हॉलमध्ये मंगळवारी आयोजित ‘प्राथमिक विकास संस्था संवाद कार्यक्रमात’ ते बोलत होते.

सचिवांच्या वेतनासाठी ९० लाखांचा निधी –
दळवी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १४४ सचिवांच्या वेतनातील फरकाची रक्कम ९० लाखांपेक्षा अधिक आहे. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर पुढील पाच वर्षे दरवर्षी ९० लाख रुपये बँकेच्या नफ्यातून सचिवांच्या वेतनासाठी देण्यात येतील. त्यामुळे विकास संस्थांचा कारभार अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होईल.’’
बिगरशेती कर्ज सात दिवसांत –
शेती अथवा बिगरशेती कर्ज मंजुरीसाठी सध्या ९० ते १०० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अनेक ग्राहक राष्ट्रीयकृत बँकांकडे वळतात. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हा बँकेने नवीन प्रणाली सुरू केली असून बिगरशेती कर्ज सात दिवसांत मंजूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे दळवी यांनी सांगितले.
गोदामासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज –
नाबार्डच्या चार टक्के व्याजदराच्या योजनेअंतर्गत गोदाम उभारणीसाठी ४० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. त्यातील एक टक्का व्याज जिल्हा बँक स्वतः भरणार असल्याने विकास संस्थांना शून्य टक्के व्याजदराने कर्जाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात २२ पेक्षा अधिक विकास संस्थांमध्ये गोदामांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
पीक विमा योजनेत आंबा, काजू आणि भातासोबतच सुपारी व नारळ पिकांचाही समावेश करण्यात आल्याचे दळवी यांनी सांगितले.
२० संस्थांचा सत्कार!
३० जून २०२६ अखेर जिल्हा बँकेच्या कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील २० विकास संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. अध्यक्ष मनीष दळवी तसेच संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रविंद्र मडगांवकर आणि विद्याधर परब यांच्या हस्ते संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारप्राप्त संस्था : आरोंदा, कोलगाव, स्थापेश्वर डेगवे, भावई क्षेत्रपाल कुणकेरी, आरोस, वाफोली, सातार्डा, वेत्ये, चराठे, देवसू, चौकुळ, मळेवाड, शिरशिंगे, वेर्ले, बांदा, इन्सुली, आजगाव, माडखोल, कारिवडे आणि माजगाव.
१०० टक्के वसुलीच्या जवळ पोहोचलेल्या विकास संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
विकास संस्थांनी कर्जवाटपाबरोबरच कर्जवसुलीतही आघाडीवर राहून संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, असे आवाहन दळवी यांनी केले.
कार्यक्रमास माजी संचालक गुरूनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, गजानन सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, दत्ताराम गावडे, के. बी. वरक, वसंत हडकर, संजय डंबे, विलास धुरी, सोनाली चव्हाण, अमोल शिंदे यांच्यासह विविध विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक अनिरुद्ध देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले.



