✍️ लखन आडेलकर.
माडखोल : देशभक्तीच्या भावनेला सुरांची साथ देत जिल्हा परिषद केंद्रशाळा माडखोल नं. १ च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत दमदार सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. श्री सद्गुरू साटम महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, माडखोल संचलित माध्यमिक विद्यालय माडखोल (धवडकी हायस्कूल) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दशक्रोशीतील तब्बल १३ शाळांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत माडखोल केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सुरेलपणा, एकजूट, शिस्त आणि देशप्रेमाचा सुंदर आविष्कार सादर केला. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १, सांगेली हिने द्वितीय, तर जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १, कारिवडे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला व गुणवत्ता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचेही कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धवडकी हायस्कूलचे माजी विद्यार्थी तथा कारिवडेचे सुपुत्र लक्ष्मण गवळी होते. प्रमुख अतिथी म्हणून धवडकी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश गवस उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मसाजी राऊळ, उपाध्यक्ष जगन्नाथ परब, सचिव सहदेव राऊळ, उमेश कारिवडेकर, नार्वेकर तसेच मुख्याध्यापक रामनाथ गोसावी उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण वेंगुर्ला तालुक्यातील भास्कर मेस्त्री आणि समृद्धी धुरी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सद्गुरू साटम महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघटना तसेच सहभागी शाळांतील शिक्षकांचे सहकार्य लाभले.



