नेमळे विद्यालयात सामान्यज्ञान प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

सावंतवाडी : स्वातंत्र्यदिन सप्ताहाचे औचित्य साधून नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचे सामान्यज्ञान समृद्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा लहान गट, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा मोठा गट होता. सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच सामान्यज्ञानाची गोडी लागावी, हा स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.

चालू घडामोडी, तालुका, जिल्हा, राज्य, देश तसेच जागतिक पातळीवरील विविध विषयांवर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. एखाद्या प्रश्नाचे उत्तर स्पर्धकांना देता न आल्यास तोच प्रश्न प्रेक्षकांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना विचारण्यात येत होता. त्यामुळे प्रेक्षक विद्यार्थ्यांनीही स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

लहान गटात एडिसन गटाने विजेतेपद पटकावले. या गटातील विजयी स्पर्धकांमध्ये पृथ्वीवेश कोळेकर, विठ्ठल कोकरे व प्राची कोळेकर यांचा समावेश आहे. मोठ्या गटातही एडिसन गटाने बाजी मारली. या गटातील विजयी स्पर्धक निमिष उमेश राऊळ, लतिका मेस्री व मृण्मय पाटकर हे आहेत.

विद्यालयातून भविष्यात उत्तम अधिकारी व यशस्वी विद्यार्थी घडावेत, या ध्येयाने दरवर्षी अशा प्रकारच्या सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन उमेश राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते.

स्पर्धेचे गुणलेखन क्रांती मयेकर यांनी, तर वेळेचे नियोजन (टाईमकीपर) सी. टी. बंगाळ यांनी पाहिले. स्पर्धकांना प्रश्न उमेश राऊळ यांनी विचारले. यावेळी प्राचार्य आर. के. राठोड, राजेश गुडेकर, अनिल कांबळे, एम. पी. सारंग, नेत्रा चव्हाण, एन. कडावलकर, आरती कोरगावकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles