नेमळे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन उपक्रमशील शिक्षकांचा ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शिक्षकांनी आपल्या कार्याची माहिती असलेले प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत संस्थेकडे पाठवावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आत्माराम भिकाजी राऊळ यांनी केले आहे.
दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा गौरव केला जातो. यंदाही दोन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यातील पहिला पुरस्कार गुरुवर्य कै. ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती नलिनी ज. पेंढारकर यांनी पुरस्कृत केला आहे. या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी आपले प्रस्ताव पाठवावेत.
दुसरा पुरस्कार सहकारमहर्षी कै. शिवरामभाऊ जाधव यांच्या पत्नी कै. सौ. प्रमिला शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ सहकारमहर्षींच्या मित्रपरिवारातर्फे पुरस्कृत करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील केवळ उपक्रमशील शिक्षिकांनी आपले प्रस्ताव पाठवायचे आहेत.
दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे आहे. शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांना या पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
इच्छुक शिक्षकांनी आपल्या कार्याची सविस्तर माहिती असलेला प्रस्ताव दोन छायाचित्रांसह २५ ऑगस्ट २०२६ पूर्वी प्राचार्य आर. के. राठोड, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे पाठवावा, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.



