सावंतवाडी : संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने अटल प्रतिष्ठानतर्फे गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ विविध संस्कृत स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. संस्कृत दिनाचे औचित्य साधून यंदाही रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय संस्कृत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांचे प्रायोजन डॉ. अमुल पावसकर आणि कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष व उद्योजक डॉ. नितीन पावसकर या बंधूंनी त्यांचे वडील स्व. महादेव ऊर्फ भास्कर नारायण पावसकर यांच्या स्मरणार्थ केले आहे.
स्पर्धा तीन गटांत घेण्यात येणार आहेत. इयत्ता पाचवी ते सहावी या गटासाठी गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धा, इयत्ता सातवी ते आठवी या गटासाठी गीत गायन स्पर्धा, तर इयत्ता नववी ते दहावी या गटासाठी कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बांबूपासून तयार करण्यात आलेली आकर्षक स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शाळांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी २५ ऑगस्ट २०२६ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी अटल प्रतिष्ठानच्या कार्यालयीन सहाय्यिका कु. ज्योती राऊळ (मो. ९४०४७५६८९५) यांच्याशी संपर्क साधावा.
संस्कृत भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर आणि कार्यवाह रघुनाथ तानावडे यांनी केले आहे.



