– सामाजिक बांधिलकी, नेतृत्व आणि समाजोपयोगी कार्याची दखल, १५ ऑगस्टला ओरोसमध्ये होणार पुरस्कार वितरण.
सिंधुदुर्गनगरी : सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या युवकांच्या कार्याला सलाम करणारा जिल्हा युवा पुरस्कार सन २०२४-२५ जाहीर करण्यात आला आहे. युवक, युवती आणि संस्था अशा तीन प्रवर्गांत पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली असून, सावंतवाडी तालुक्यातील जयराम आत्माराम जाधव, फिजा अब्दुल मकानदार आणि ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग’ यांनी या पुरस्कारावर नाव कोरले आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय युवा पुरस्कार समितीच्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांची छाननी, गुणांकन आणि सविस्तर चर्चेनंतर पुरस्कारार्थींची सर्वानुमते निवड करण्यात आली. यंदा पुरस्कारासाठी एकूण ८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामध्ये चार संस्था, दोन युवक आणि दोन युवतींच्या प्रस्तावांचा समावेश होता.
जयराम जाधव यांच्या समाजसेवेला सलाम!

युवक प्रवर्गात निरवडे (ता. सावंतवाडी) येथील जयराम आत्माराम जाधव यांची निवड झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतावादी क्षेत्रात त्यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. गरजू व वंचित घटकांसाठी आरोग्य शिबिरे, रक्तदान जनजागृती, औषधे व जीवनावश्यक साहित्याचे वितरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचा ठसा उमटविला आहे.
युवकांना सामाजिक कार्याशी जोडण्यासोबतच सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांची युवक प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे.
फिजा मकानदार यांच्या कार्याचीही दखल.

युवती प्रवर्गात कोलगाव (ता. सावंतवाडी) येथील फिजा अब्दुल मकानदार यांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, कला आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. मोफत आरोग्य शिबिरे, महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान, वृक्षारोपण, युवा नेतृत्व व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तंबाखूविरोधी उपक्रम तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या कार्याची दखल समितीने घेतली.
‘कोकण कला व शिक्षण विकास संस्थे’चा गौरव!

संस्था प्रवर्गात ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग’ यांची निवड झाली आहे. शिक्षण, महिला सक्षमीकरण, दुर्बल घटकांसाठी कार्य, आपत्ती व्यवस्थापन, युवा विकास, पर्यावरण, आरोग्य आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने विविध उपक्रम राबविले आहेत. समाजोपयोगी विविध क्षेत्रांत सातत्याने केलेल्या बहुआयामी आणि व्यापक कार्याची दखल घेत संस्थेला हा सन्मान जाहीर झाला आहे.
युवकांना १० हजार, संस्थेला ५० हजारांचे पारितोषिक
पुरस्काराचे स्वरूपही विशेष आहे. युवक आणि युवती प्रवर्गातील पुरस्कारार्थींना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी १० हजार रुपये रोख, तर संस्था प्रवर्गातील विजेत्या संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे.
१५ ऑगस्टला ओरोसमध्ये पुरस्कार वितरण
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस कवायत मैदान, ओरोस येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. युवकांच्या उल्लेखनीय कार्याला व्यासपीठ देतानाच त्यांच्या कार्यातून जिल्ह्यातील इतर युवकांना प्रेरणा मिळावी, हा जिल्हा युवा पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे.
बैठकीस क्रीडा व युवक उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांच्यासह जिल्हास्तरीय युवा पुरस्कार समितीचे सदस्य उपस्थित होते.



