हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानची भरपाई वाढविण्याचा विचार करा ! : वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई व्यवहार्य दृष्टिकोनातून वाढविण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघातील हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, दोडामार्ग तालुक्यातील वन्यजीव संवर्धनासाठी अधिसूचित केलेल्या जागेचा वापर तसेच सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील कांदळवन बोर्डवॉक व इंटरप्रिटेशन सेंटरच्या रखडलेल्या कामांना गती देण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत तिन्ही विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत खासदार सुनील तटकरे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या होत्या. या अनुषंगाने झालेल्या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हत्तींच्या उपद्रवावर प्रभावी उपाययोजना –

पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांचा, तर कोकणात हत्तींचा उपद्रव वाढला आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे शेतजमिनीचे नुकसान होता कामा नये, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देताना शेतकऱ्यांचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करून नुकसान भरपाईच्या रकमेत आवश्यक वाढ करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींच्या उपद्रवावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना ट्रँक्विलायझरची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी दिले.

दोडामार्गमधील वन्यजीव संवर्धनासाठी उपाययोजना –

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या पाण्याच्या मागील भागातील जागा वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी अधिसूचित करण्यात आली आहे. या जागेला आवश्यक कंपाउंड करणे, वन्यप्राण्यांना या परिसरात स्थलांतरित करणे तसेच त्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या कामांना नियोजनबद्ध पद्धतीने गती देण्याच्या सूचना वनमंत्री नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आरोंदा कांदळवन प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी –

सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा विभागातील कांदळवन बोर्डवॉक, इंटरप्रिटेशन सेंटर आदी कामांना कांदळवन प्रतिष्ठान मार्फत मंजुरी देण्यात आली आहे. या कामांचे आराखडे तसेच आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. तसेच या कामांसाठी कांदळवन प्रतिष्ठानमार्फत मंजूर करण्यात आलेल्या निधीस मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.

कांदळवन पार्कसह संबंधित विकासकामांना गती देऊन स्थानिकांच्या अडीअडचणी दूर करण्याच्या सूचना वनमंत्री नाईक यांनी दिल्या. लोकांच्या अडीअडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि विकासकामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका वन मंत्री नाईक यांनी यावेळी मांडली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles