मुंबई : कोळी-आगरी बांधवांनी जी मुंबई उभी केली, ज्या कष्टकरी, सर्वसामान्यांनी त्यांच्या कष्टातून मुंबई उभी केली त्याच मुंबईत आता तुमचा मांसाहार हा तुम्हाला घर मिळणार की नाही हे ठरवणार आहे. तसंच काही चित्र आता सर्वत्र मुंबईत दिसतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो म्हणतोय की, तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही. तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल. भावेश कावरेच्या व्हिडीओवरून आता संताप व्यक्त केला जात आहे.
‘ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही’
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इस्टेट एजंट भावेश कावरे हा ताडदेव परिसरातील एका घराची माहिती सांगताना दिसतोय. तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही. तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल, असं त्या व्हिडीओमध्ये सांगताना दिसतोय.
इस्टेट एजंट असलेल्या भावेश कावरे याच्या या व्हिडीओवर आता संताप व्यक्त केला जात आहे. माणूस मच्छी, मटण किंवा चिकन खातो म्हणून त्याला घर नाकारणे ही केवळ मनमानी नाही, तर ही उघड सामाजिक भेदभावाची मानसिकता आहे. मुंबईत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आणि मच्छी-मटण खाणाऱ्या मराठी माणसाला आता त्याच्या ताटावरून घर मिळणार की नाही हे ठरवले जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.



