स्वच्छतेसाठी आयुष्य झिजविणाऱ्या कर्मचाऱ्याला सावंतवाडी नगरपालिकेची भावपूर्ण श्रद्धांजली! ; सफाई कर्मचारी धोंडू बरागडे यांचे आकस्मिक निधन, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवकांकडून कुटुंबीयांचे सांत्वन.

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या स्वच्छतेसाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावणारे सावंतवाडी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी धोंडू गंगाराम बरागडे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सावंतवाडी नगरपालिकेच्या परिवारावर शोककळा पसरली असून, सफाई कर्मचारी वर्गासह संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.

या दुःखद प्रसंगी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे लखम सावंत-भोसले यांच्यासह सभापती व नगरसेवकांनी बरागडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत नगरपालिकेचा संपूर्ण परिवार त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचा धीर देण्यात आला.

‘नगरपालिकेने एक प्रामाणिक आणि कष्टकरी सेवक गमावला’

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले म्हणाल्या की, धोंडू बरागडे यांनी नगरपालिकेत अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावली. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या अचानक जाण्याने नगरपालिकेने एक कष्टकरी, प्रामाणिक आणि सेवाभावी कर्मचारी गमावला आहे.

बरागडे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखाच्या प्रसंगी नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वासही यावेळी उपस्थित नगरसेवकांनी व्यक्त केला.

शासकीय लाभ व आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन

स्व. धोंडू गंगाराम बरागडे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून मिळणारे सर्व शासकीय लाभ आणि आवश्यक ती मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी यावेळी दिले.

या प्रसंगी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर अडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.

उपस्थित सर्वांनी स्व. धोंडू गंगाराम बरागडे यांच्या प्रतिमेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, ‘ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि बरागडे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,’ अशी प्रार्थना केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles