शेर्लेतील निकृष्ट रस्ते-पुलाच्या कामांवर संताप! दोषींवर कारवाई करा!” ; स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार प्रशांत जाधव.

सावंतवाडी : शेर्ले परिसरातील रस्ते आणि पुलाच्या कामांचा दर्जा अत्यंत खालावल्याचा आरोप करत सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेलचे युवा प्रमुख प्रशांत जाधव यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निकृष्ट कामांची क्वालिटी कंट्रोलमार्फत तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

शेर्ले सॉ मिल ते नदीपर्यंतचा रस्ता तसेच शेर्ले-कापईवाडी ते सॉ मिल या मार्गावरील कामांचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काम पूर्ण होऊनही रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून सोल्डरपट्टीचे कामही योग्य पद्धतीने करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ऐतिहासिक कापई पूलही धोक्याच्या छायेत!

शेर्ले परिसरातील ऐतिहासिक कापई पुलाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुलाला आवश्यक संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नसल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

याशिवाय रस्त्याच्या कामाचा नामफलक लावण्यात आलेला नाही, गटारांची योग्य ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली नाही, तसेच एसटी बसला वळण्यासाठी आवश्यक असलेला प्लॅटफॉर्मही बांधण्यात आलेला नाही, अशा अनेक त्रुटींकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.

“काम जनतेच्या पैशातून, मग दर्जाशी तडजोड का?”

सार्वजनिक बांधकामांमध्ये दर्जाशी तडजोड होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे, अशी भूमिका प्रशांत जाधव यांनी घेतली आहे. करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा टिकवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री पूर्तता न करता प्रत्यक्ष कामाची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या सर्व प्रकरणाची क्वालिटी कंट्रोलमार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

“प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून ग्रामस्थांना न्याय द्यावा; अन्यथा स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा प्रशांत जाधव यांनी दिला आहे.

शेर्लेतील रस्ते-पुलांच्या कामांचा दर्जा आता प्रशासनाच्या कसोटीवर लागला असून, या निवेदनानंतर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles