‘एक थेंब… एक आशा’! – ग्रामीण आरोग्यसेवेसाठी ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा शुभारंभ! ; कुडाळात अँब्युलन्स सेवेला सुरुवात, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उमा प्रभू यांसह आ. निलेश राणे यांची विशेष उपस्थिती. 

कुडाळ : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सहज आणि तातडीने उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मानव साधन विकास संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ कुडाळ येथे उत्साहात पार पडला. ‘एक थेंब… एक आशा’ या संवेदनशील संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्याची नवी आशा ठरणार आहे.

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कोकणभूमीचे सुपुत्र तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू, मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी सुरेश प्रभू यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “कोकणभूमीचे सुपुत्र सुरेशजी प्रभू हे देशासाठी एक संपत्ती आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या कोकणचे आहे, हे आपले भाग्य आहे.”

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणीसाठी शहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये, यासाठी गावपातळीवरच आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून गरजू नागरिकांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.

या सेवाभावी उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी सौ. उमा प्रभू आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

‘आरोग्यसेवा गावाच्या दारी’ या उद्देशाने सुरू झालेला ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा उपक्रम ग्रामीण सिंधुदुर्गासाठी निश्चितच आशादायी पाऊल ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles