कणकवली : बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यातून संस्कारक्षम पिढी घडावी, या उद्देशाने शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रकाशजी कामत यांनी विद्यामंदिर प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘नित्य संस्कार’ ही संस्कारमूल्यांची पुस्तके मोफत देणगी म्हणून दिली. त्यांच्या या उपक्रमातून शाळेत वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रेरणादायी प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी बालवयातच मनाचे श्लोक, संस्कृत सुभाषिते तसेच विविध संस्कारपर साहित्याचे नियमित वाचन केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो. आजच्या डिजिटल युगात वाचनापासून दुरावत चाललेल्या नव्या पिढीला पुन्हा पुस्तकांकडे वळविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी प्रकाश कामत यांनी सांगितले.

भविष्यातील पिढी ज्ञान, संस्कार आणि मूल्यांनी समृद्ध व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्कारक्षम पुस्तके भेट देऊन वाचनाचे महत्त्व पटवून देण्याचा हा उपक्रम शाळेच्या वाचन चळवळीला निश्चितच बळ देणारा ठरला.
या उपक्रमावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. करंबेळकर तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे आणि पर्यवेक्षक ए. व्ही. वणवे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रेरणादायी उपक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर, सचिव विजयकुमार वळंजू आणि विश्वस्त अनिलपंत डेगवेकर यांनी स्वागत व कौतुक केले.
‘पुस्तक हातात, संस्कार मनात आणि उज्ज्वल भविष्याची वाटचाल’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा प्रकाश कामत यांचा हा उपक्रम पालक, विद्यार्थी आणि समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.



