अभिनव फाउंडेशनच्या जनहित याचिकेमुळेच मल्टीस्पेशालिटीचा मार्ग मोकळा! : डॉ. जयेंद्र परुळेकर. ;इमारत उभी राहणार, पण डॉक्टर कुठून आणणार?”, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांचा दाखला देत डॉ. परुळेकरांचा सवाल.

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा न्यायालयीन तिढा सुटला म्हणून जणू काही रुग्णालय सुरू झाले आणि शस्त्रक्रियाही पार पडली, अशा पद्धतीने श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा जोरदार टोला सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लगावला.

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सुटण्यामागे अभिनव फाउंडेशनने उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका महत्त्वाची ठरली, असा दावा डॉ. परुळेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे या रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा सुरू असलेला प्रयत्न योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“जमीन दिल्याचा आविर्भाव; प्रत्यक्षात मिळवली ५० गुंठे जमीन”

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी ९० गुंठे जमीन विनामूल्य दिल्याचे सांगितले जात असल्याचा संदर्भ देत डॉ. परुळेकर यांनी संबंधितांवर टीका केली.

“विनामूल्य काही सोडले नाही. या केसमधून ५० गुंठे जमीन मिळवली. मोठा त्याग केल्याचा आविर्भाव आणून जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“आज पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज असते, तर त्यांनी आरोग्य सुविधांसाठी सर्व जमीन सढळ हस्ते दान केली असती. त्यांच्यामध्ये देण्याची वृत्ती होती. म्हणूनच आजही प्रत्येकाच्या हृदयात त्यांचे स्थान आहे,” असेही डॉ. परुळेकर म्हणाले.

“८० कोटींची इमारत उभी करणार; पण डॉक्टर कुठून आणणार?”

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात खर्च होणार असला तरी प्रत्यक्षात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार का, हा खरा प्रश्न असल्याचे डॉ. परुळेकर यांनी सांगितले.

“मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणून ८० कोटी रुपयांची इमारत उभी करणार आहात. पण त्या इमारतीमध्ये किती डॉक्टर येतील, रुग्णांना कोणत्या सुविधा मिळतील, याची खात्री कोण देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता असताना मोठ्या रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याचे त्यांनी नमूद केले.

“उपजिल्हा रुग्णालयात १९ पैकी फक्त दोन पदे भरली!”

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत डॉ. परुळेकर यांनी आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टरांच्या १९ जागांपैकी केवळ दोन जागा भरल्या आहेत. अशा परिस्थितीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक एमडी आणि एमसीए पदवीधर तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण भागात कसे आणणार?” असा सवाल त्यांनी केला.

केवळ मोठी इमारत उभारणे म्हणजे आरोग्यसेवा सक्षम होणे नव्हे. त्या इमारतीत तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी, अत्याधुनिक उपकरणे आणि नियमित सेवा उपलब्ध असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“इमारतींपेक्षा आरोग्यसेवेला प्राधान्य द्या!”

राज्यात कोट्यवधी रुपये खर्च करून केवळ इमारती उभारण्याची स्पर्धा सुरू असल्याचा आरोप करत डॉ. परुळेकर यांनी सरकारवरही निशाणा साधला.

“इमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च करून त्याबदल्यात ठेकेदारांकडून ४० टक्क्यांपर्यंत कमिशन लाटण्याची स्पर्धा सुरू आहे. मल्टीस्पेशालिटीच्या नावाखालीही असाच प्रकार होऊ नये,” असा टोला त्यांनी लगावला.

रुग्णालयाची भव्य इमारत उभी करण्यापेक्षा त्यामध्ये प्रत्यक्षात गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार, परवडणारी आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा मिळणार आहे की नाही, याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“२०१४ पासून रुग्णालयाच्या नावावर मतदारांची दिशाभूल?”

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. आता तडजोडीतून त्यातील काही जमीन सावंतवाडीच्या राजघराण्याला देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. मग गेली अनेक वर्षे ही तडजोड का झाली नाही? असा सवाल डॉ. परुळेकर यांनी उपस्थित केला.

“मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कथा सांगून मतदारांची दिशाभूल करत २०१४ पासून आमदार दीपक केसरकर यांनी आजपर्यंत आमदारकीच्या निवडणुका जिंकल्या,” असा आरोपही त्यांनी केला.

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा विषय केवळ राजकीय श्रेयाचा न बनवता सावंतवाडी आणि सिंधुदुर्गातील जनतेला प्रत्यक्षात चांगली आरोग्यसेवा मिळावी, या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्याची गरज असल्याचे डॉ. परुळेकर यांनी सांगितले.

“जागेचा तिढा सुटला आता खरी परीक्षा आरोग्यसेवेची!”

दरम्यान, रुग्णालयाच्या जागेचा न्यायालयीन प्रश्न सुटणे हा केवळ पहिला टप्पा आहे. आता रुग्णालयाची उभारणी, आवश्यक मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक सुविधा आणि सर्वसामान्यांना परवडणारी उपचार व्यवस्था प्रत्यक्षात उभी राहणे ही खरी कसोटी असल्याचे डॉ. परुळेकर यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले.

जमीन आणि इमारतीच्या राजकारणापलीकडे जाऊन रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles