सीमेवरच्या जवानांसाठी इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेच्या चिमुकल्यांची प्रेमाची राखी! ; ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जपला देशप्रेमाचा धागा, राख्यांसोबत ‘जय हिंद, सैनिक आमचा अभिमान’चा संदेश!

तळवडे  : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण नव्हे, तर प्रेम, कृतज्ञता आणि आपुलकीच्या भावनेने मने जोडणारा सण आहे. याच भावनेला देशप्रेमाची सुंदर किनार देत इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडे येथील विद्यार्थ्यांनी सीमेवर देशरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांसाठी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा भावस्पर्शी उपक्रम उत्साहात राबविला.

देशाच्या सीमेवर कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, रणरणते ऊन अशा प्रतिकूल परिस्थितीतही मातृभूमीच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभ्या असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रेमाने राख्या तयार केल्या. काही विद्यार्थ्यांनी घरून सुंदर राख्या आणल्या, तर काहींनी शाळेतच आकर्षक राख्या तयार करून त्या संकलन पेटीत जमा केल्या.

या राख्यांसोबत विद्यार्थ्यांनी ‘जय हिंद’, ‘सैनिक आमचा अभिमान’, ‘भारत माता की जय’ अशा देशप्रेमाने भारलेल्या संदेशांच्या चिठ्ठ्याही पाठवल्या. त्यामुळे या चिमुकल्यांच्या हातांनी तयार झालेल्या राख्यांमध्ये केवळ रंगीबेरंगी धागे नव्हते, तर त्यात सैनिकांप्रती असलेला आदर, प्रेम आणि देशभक्तीची भावना गुंफलेली होती.

या उपक्रमाला शाळेच्या सीईओ मैथिली नाईक, मुख्याध्यापिका प्रणिता मयेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तळवडे येथील डाक कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेचा परिसर देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेला.

यावेळी बोलताना शाळेच्या सीईओ मैथिली नाईक म्हणाल्या, “देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम व कृतज्ञतेची भावना बळकट व्हावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”

विद्यार्थ्यांनी प्रेमाने तयार केलेल्या या राख्या आता टपालाद्वारे सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. त्यामुळे तळवडेच्या चिमुकल्यांच्या हातातील हा प्रेमाचा धागा हजारो किलोमीटर दूर सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या मनगटावर बांधला जाणार असून, रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैनिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भावनिक नाते जोडणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

देशाच्या सीमेवर जवानांचा पहारा आणि तळवडेच्या चिमुकल्यांच्या मनात देशप्रेमाचा उजेड—‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमातून रक्षाबंधनाचा खरा अर्थच विद्यार्थ्यांनी अनुभवला!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles