सावंतवाडी : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण नव्हे, तर आपुलकी, कृतज्ञता आणि भावबंध जपण्याचा दिवस. याच भावनेला देशप्रेमाची जोड देत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १, कास, ता. सावंतवाडी येथील विद्यार्थ्यांनी सीमेवर देशरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी प्रेमाने राख्या पाठविल्या.
देशाच्या रक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘सैनिक आमचा अभिमान’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांमधून जवानांप्रती असलेला आदर, प्रेम आणि देशभक्तीची भावना प्रकर्षाने दिसून आली.

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा गजानन गोठोस्कर तसेच सहाय्यक शिक्षक प्रशांत मडगावकर, श्री. शिरोडकर आणि प्रसाद देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अनोखी संधी मिळाली.
दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रमेश कुडके आणि उपाध्यक्ष श्रीमती काव्या पंडित यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सीमेवर तैनात जवान आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर राहून देशाची सुरक्षा करतात. अशा वीर जवानांच्या मनगटावर कासच्या चिमुकल्यांनी पाठविलेली राखी पोहोचणार असून, या छोट्याशा राखीतून मोठ्या देशप्रेमाचा संदेश सीमेपर्यंत पोहोचणार आहे.
कासच्या विद्यार्थ्यांनी जपला देशप्रेमाचा धागा; जवानांसाठी पाठविलेल्या राख्यांमधून उमटला ‘भारत माता की जय’चा जयघोष!



