कणकवली : आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परंतु या परिस्थितीतही जनतेचे प्रश्न घेऊन आपल्याला पक्ष पुढे न्यायचा आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोण आलेले नाही. त्यामुळे सत्ता बदल अटळ आहे.त्यासाठी आपण चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम करत राहणे गरजेचे आहे. संघटनेत जी पदे रिक्त आहेत त्याठिकाणी योग्य व्यक्तींची निवड करावी. पदाधिकाऱ्यांनी गावागावात दौरे करून जनतेशी संपर्क वाढविला पाहिजे.आपल्या देशात तरुणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांची घुसमट होत आहे. या सरकार विरोधात तरुणाईचा स्फोट होण्याची शक्यता आहे. जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर आपण सर्वांना संघटीत करून त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले तर जनता ते कधीच विसरणार नाही. ६० वर्षापूर्वी काहीही नसताना बाळासाहेबांनी एवढी मोठी बलाढय संघटना निर्माण केली. त्याची प्रेरणा घेऊन पुन्हा नव्या दमाने आपल्याला संघटना उभारली पाहिजे. लवकरच उद्धवजींचा दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित केला जाईल असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज कणकवली विजय भवन येथे संपन्न झाली.नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यासाठी तालुकाप्रमुखांनी नावे सुचविण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते विजय कदम, जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक, महिला जिल्हासंघटक नीलम पालव,श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,कुडाळ विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,सुनील तेली,लक्ष्मण रावराणे,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,नंदू शिंदे,रवींद्र जोगल,हरी खोबरेकर,राजन नाईक,राजेश शेटकर,रमेश सावंत,संजय गवस,निलेश चमणकर, बबन बोभाटे, राजू राठोड, महिला आघाडीच्या प्रतीक्षा साटम,संपदा देसाई,विनिता घाडी,नलिनी पाटील,देवयानी मसुरकर, श्वेता हुले,स्नेहा दळवी,भारती कासार,जेनिफर लोबो,पल्लवी पाचकुडे,साक्षी चमणकर,नम्रता झारापकर,पूजा राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख मंदार ओरसकर,उत्तम लोके,रोहित पावसकर,सागर नानोस्कर,मदन राणे,विश्वनाथ म्हापणकर, जि.प.सदस्य विजय नाईक,संजय गावडे, गंगाराम सडवेलकर, संतोष शिरसाट,बाबी जोगी,निशी तोरसकर,विकास कोयंडे, अमित भोगले,अवधूत मालणकर,अतुल बंगे,सुशील चिंदरकर आदी उपस्थित होते.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, अनेक नेते, पदाधिकारी पक्ष सोडून गेले असले तरी निष्ठावंत शिवसैनिक अजून शिवसेनेसोबत आहेत.अनेकांना आमिषे दिली जात आहेत परंतु त्यांनी पक्षाशी निष्ठा दाखवली आहे. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त बुथवर बी.एल.ए. यांची नेमणूक केली आहे.शिवसेना वाढीसाठी सर्वजण मेहनत घेत आहेत.परंतु एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही. कोण आपल्याला भेटणार किंवा मदत करणार यांची वाट न बघता एकलव्या प्रमाणे संघटनेसाठी आपल्याला काम केले पाहिजे. या सरकार विरोधात आता लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्याला वाचा फोडण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे असे सांगितले.
अरुण दुधवडकर म्हणाले, आता जरी आपला संघर्षाचा काळ असला तरी येणारा काळ आपला आहे. त्यासाठी आपण आतापासून संघटना बांधणी करून लोकांमध्ये संपर्क ठेवला पाहिजे. गटबाजीला थारा देता कामा नये सर्वानी एकदिलाने, एकजुटीने काम करावे. नवीन सदस्य नोंदणी करावी. एकाच कुटुंबाकडे जिल्हा गेल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांना आपण विरोध केला पाहिजे.अशा पद्धतीने काम केल्यास नक्कीच आपल्याला गतवैभव प्राप्त होईल असे सांगितले.
उपनेते विजय कदम म्हणाले, केवळ सत्तेसाठी आणि राजकारणासाठी शिवसेना पक्ष काम करत नाही.शिवसेना हि तळागाळातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे. लोकांची छोटी कामे करण्यासाठी शिवसेना कार्यरत आहे. संपूर्ण कोकण ठाकरेंच्या अगदी जवळचा आहे.आपल्या पक्षाला ६० वर्षे झाली सुरुवातीपासून इथला मतदार बाळासाहेबांच्या विचारांशी जोडला गेला आहे.मागच्या निवडणुकीत आपले आमदार ,खासदार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले परंतु पुढच्या निवणुकीत मतांचा हा फरक आपल्याला भरून काढायचा आहे. आता तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. तरुणाईच्या एकजुटीमुळे मग्रूर झालेल्या मोदी सरकारला झुकावे लागले. मोदींच्या कॅबिनेट मधील मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. उद्या मोदींना देखील राजीनामा देण्याची वेळ येईल, असे सांगितले.



