सावंतवाडी : कोकणातील प्रवाशांच्या सेवेला आता आधुनिकतेची नवी झालर लाभणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या नवीन आणि अत्याधुनिक बसेसचा सावंतवाडी एसटी ताफ्यात दिमाखदार प्रवेश झाला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ५ नवीन बसेसचे आज सावंतवाडी बसस्थानकात आगमन झाले. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजन, श्रीफळ वाढवून आणि बसफेरीचा शुभारंभ करत या बसेसचे लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पणानंतर नव्या बसमधून आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी शहराची सफर केली. नव्या बसच्या आगमनामुळे प्रवाशांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
सावंतवाडी मतदारसंघाला मिळणार तब्बल ३० नव्या बसेस –
यावेळी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले, “परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यातून हे स्वप्न साकार झाले आहे.”
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३० नव्या बसेस मंजूर झाल्या असून त्यापैकी वेंगुर्ला व दोडामार्गसाठी प्रत्येकी ५, तर सावंतवाडीसाठी १० बसेस देण्यात आल्या आहेत. त्यातील पहिल्या ५ बसेस सावंतवाडीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या तोंडावर या अत्याधुनिक बसेस दाखल झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, एसटी कर्मचारी प्रवाशांना उत्तम आणि सुरक्षित सेवा देतील, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.
बसस्थानकातील खड्डेही तातडीने बुजविणार!
सावंतवाडी बसस्थानकाच्या सुरू असलेल्या कामाबाबतही आमदार केसरकर यांनी भाष्य केले. बसस्थानकातील खड्डे पडलेल्या ठिकाणी तातडीने काम करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थितांची मोठी गर्दी –
या लोकार्पण सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, सभापती सुस्मिता जाधव, स्थानक प्रमुख गौतमी कुबडे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, अशोक दळवी, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, राजन रेडकर, गजानन नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, राजू कुबल, हर्षद डेरे, सत्यवान बांदेकर, बबलू मिशाळ, क्लेटस फर्नांडिस, हेमंत बांदेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, गुंडू जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी सावंतवाडीच्या एसटी सेवेला मिळालेली ही ‘राजमाता जिजाऊ’ची नवी साथ प्रवाशांसाठी सुखकर, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाची नवी सुरुवात ठरणार आहे.



