गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांच्या ‘दुरुस्तीची घंटा’ वाजणार, निरवडे-न्हावेली- दांडेली-तळवणे-आरोंदा मार्गाची अधिकाऱ्यांकडून पाहणी. ; माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या मागणीला तातडीची दखल.

सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निरवडे-आरोस तिठा-न्हावेली-विवरवाडी-दांडेली-कोंडूरा-तळवणे-आरोंदा या प्रमुख मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्हावेली-विवरवाडी येथे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. तर दांडेली, कोंडूरा आणि तळवणे परिसरात ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता पूजा इंगवले तसेच उपअभियंता पाटील यांच्याशी चर्चा करून गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी केली होती.

या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठविले. यावेळी रस्त्यावरील खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे तसेच रस्त्यालगत वाढलेली झाडी यांची सविस्तर पाहणी करण्यात आली.

पाण्याचा निचरा सुरळीत करणे, धोकादायक खड्डे तातडीने बुजविणे आणि रस्त्यालगतची झाडी साफ करून वाहतुकीस मोकळा मार्ग उपलब्ध करून देणे, अशा स्पष्ट सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गाला ‘खड्डेमुक्तीचा प्रसाद’ मिळणार का, याकडे आता परिसरातील वाहनधारक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढत असल्याने रस्त्याची दुरुस्ती केवळ सोयीची बाब नसून वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक पाऊल असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

या पाहणीवेळी न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर, अक्षय नाईक, राज धवण, रुपेश मोरजकर, कुलदीप नार्वेकर आणि प्रज्योत मालवणकर उपस्थित होते.

गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजतील, पाण्याचा निचरा होईल आणि वाढलेली झाडी हटविली जाईल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles