आरोंदा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना छत्र्यांची ‘सामाजिक सावली’! ; राऊत अँड कंपनी व रो-वस्त्रचा स्तुत्य उपक्रम., विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना छत्र्यांचे वाटप.

आरोंदा : पावसाच्या सरींमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाटचाल सुखकर व्हावी, या सामाजिक जाणिवेतून राऊत अँड कंपनी तसेच रो-वस्त्र यांच्या माध्यमातून आरोंदा हायस्कूलमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून प्रशालेतील सुमारे १०० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना छत्र्यांची ‘सामाजिक सावली’ मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने झाली. प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजाता परब होत्या.

यावेळी आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश परब, उपाध्यक्ष रघुनाथ (बबन) नाईक, रो-वस्त्रचे रोहन परब, सचिव वासुदेव (भाई) देऊलकर, खजिनदार रुपेश धर्णे, सदस्य रामचंद्र कोरगांवकर, स्नेहा गडेकर, आरोंदा ग्रामपंचायतीच्या प्रशासक सायली साळगांवकर, स्मिताली नाईक, सुभद्रा नाईक, शिल्पा नाईक, नरेश देऊलकर, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री रेडकर, सदस्य गौरी नाईक, शिक्षणप्रेमी विद्याधर नाईक, सेवानिवृत्त शिक्षक बाळा आरोंदेकर, शांताराम परब, नयन चोडणकर, चंदन गोसावी आदी उपस्थित होते.

‘शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यावे’

यावेळी मनोगत व्यक्त करताना संदेश परब म्हणाले, “राऊत अँड कंपनी तसेच रो-वस्त्र यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आरोंदा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढेही प्रशालेला आवश्यक ते सहकार्य केले जाईल. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन प्रयत्न करावेत.”

रो-वस्त्रचे रोहन परब यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना सातत्याने सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कोरगांवकर व शिक्षक ताराचंद राठोड यांनी केले, तर बाळा आरोंदेकर यांनी आभार मानले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, पावसापासून संरक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीची ऊब देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles