सावंतवाडी : आकेरी गावातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेली एसटी बससेवा सुरळीत करावी, तसेच आकेरी येथील निर्धारित व मान्यताप्राप्त बसथांब्यावर सर्व एसटी बस थांबविण्याबाबत चालक-वाहकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी आकेरी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रश्नावर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सावंतवाडी बसस्थानक प्रमुख गौतमी कुबडे यांची भेट घेत निवेदन सादर केले.
सावंतवाडी बसस्थानकावरून आकेरीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जाणार नाही तसेच आकेरी येथे बस थांबविण्यात येणार नाही, असे काही चालकांकडून सांगण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न असल्याने ग्रामस्थांनी तातडीने बसस्थानक प्रशासनाचे लक्ष वेधले.
आकेरी गावातील अनेक विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दररोज सावंतवाडी येथे ये-जा करतात. त्याचप्रमाणे महिला, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, कामगार आणि इतर प्रवासी शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा व विविध दैनंदिन कामांसाठी एसटी सेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, काही बस चालक व वाहक आकेरी येथे प्रवासी घेण्यासाठी बस थांबवत नसल्याच्या तसेच बस थांबूनही विशेषतः विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या.
कुडाळहून सावंतवाडीकडे येणाऱ्या काही बस आकेरीतील प्रवाशांना न घेता थेट सावंतवाडीला जात असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. “ग्रामस्थांना चालक, वाहक किंवा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी संघर्ष नको; मात्र नियमांनुसार सुरक्षित, नियमित आणि हक्काची वाहतूक सेवा मिळणे हा प्रवाशांचा अधिकार आहे,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेणाऱ्या संबंधित चालकाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, आकेरी येथील अधिकृत बसथांब्यावर बस थांबविण्याबाबत सर्व चालक व वाहकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, तसेच सावंतवाडी बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि महिला पोलीसांची व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
ग्रामस्थांच्या मागण्यांवर बसस्थानक प्रमुख गौतमी कुबडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आकेरीच्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती सीताराम उर्फ जीजा तेली, राजन भगत, बाळा सावंत, किरण गावडे, आनंद परब, गंगाराम वरक, शंकर परब यांच्यासह आकेरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर!
आकेरीतील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा-कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी एसटी सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे बस थांबविणे, विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आणि अधिकृत थांब्यावर सेवा उपलब्ध करून देणे याबाबत प्रशासनाने स्पष्टता व शिस्त राखावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



