बुद्धिबळाच्या पटावर मुक्ताई ॲकेडमीची ‘शह-काटशह’ची विजयी चाल! ; साक्षी, गार्गी, चारुल, श्रेया, लिएण्डर, चिदानंद अन् पार्थ यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड. ; तालुकास्तरीय स्पर्धेत गुणवत्तेचा ठसा, मुक्ताईच्या शिलेदारांनी गाजवला बुद्धिबळाचा पट.

सावंतवाडी : बुद्धीची तीक्ष्णता, डावपेचांची अचूक आखणी आणि विजयाची जिद्द यांच्या जोरावर मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाच्या पटावर पुन्हा एकदा आपली विजयी मोहर उमटवली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे बांदा येथे आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेत दिमाखदार प्रवेश मिळवला.

या स्पर्धेत ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकर, गार्गी सावंत, चारुल जाधव, श्रेया माणगावकर, सलोनी चव्हाण, लिएण्डर पिंटो, चिदानंद रेडकर, पार्थ गावकर, हर्ष राऊळ, यश सावंत, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर, दर्श सावंत आणि गौरांग टोपले यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

साक्षी-गार्गीची पुन्हा विजयी मोहोर!

राष्ट्रीय कॅरमपटू साक्षी रामदूरकर हिने आपल्या बुद्धिबळातील कौशल्याचीही दमदार प्रचिती देत १७ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, सलग पाच वर्षे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा बहुमान तिने मिळवला आहे.

आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू गार्गी सावंत हिनेही आपल्या अनुभवाची आणि बुद्धीचातुर्याची चमक दाखवत १४ वर्षांखालील गटात अव्वल स्थान पटकावले. गार्गीची सलग तिसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पहिल्याच डावात ‘चेकमेट’; चारुल-श्रेया-लिएण्डरची चमक!

स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या चारुल जाधव हिने १७ वर्षांखालील गटात तिसरा, तर श्रेया माणगावकर हिने चौथा क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची झलक दाखवली.

१४ वर्षांखालील गटात प्रथमच सहभागी झालेल्या लिएण्डर पिंटो याने थेट पहिला क्रमांक पटकावत विजयी सलामी दिली. त्याच गटात चिदानंद रेडकर याने तिसरा क्रमांक मिळवला.

तर १७ वर्षांखालील गटात पार्थ गावकर याने चौथा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दहा वर्षांची यशस्वी परंपरा कायम!

मुक्ताई ॲकेडमीने गेल्या दशकभरात शालेय क्रीडा क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. ॲकेडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांतून विभागीय तसेच राज्यस्तरावर मजल मारत यशाची पताका फडकवली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याची परंपरा जोपासणारी मुक्ताई ॲकेडमी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय ॲकेडमी म्हणून ओळख निर्माण करत आहे.

मार्गदर्शनाची ‘विजयी चाल’

मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय बुद्धिबळपटू तथा प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला प्रशिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने बुद्धिबळाच्या पटावर मुक्ताई ॲकेडमीच्या यशाची मोहर अधिकच गडद झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles