सावंतवाडी : पीळदार शरीरयष्टी, स्नायूंचा दमदार आविष्कार, मेहनतीचा आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन… अशा उत्साहपूर्ण वातावरणात सावंतवाडीत बहुप्रतीक्षित ‘भाजपा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार दिमाखात सुरू झाला. भाजपा सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेमुळे शरीरसौष्ठव क्षेत्रातील युवा खेळाडूंना आपले सामर्थ्य आणि कौशल्य दाखविण्यासाठी एक प्रतिष्ठेचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात रुजविलेल्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेला बळ देत युवकांमध्ये आरोग्य, व्यायाम, तंदुरुस्ती आणि शारीरिक सुदृढतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत युवकांनी व्यायामाला प्राधान्य द्यावे, शरीर कमविण्यासोबतच निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा, हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जात आहे.

या उद्घाटन सोहळ्याला सावंतवाडीचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, क्रीडा सभापती आनंद नेवगी, नगरसेवक तथा भाजपा प्रवक्ते ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोज नाईक, दिलीप भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘भाजपा श्री’च्या निमित्ताने सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, शरीरसौष्ठवाच्या माध्यमातून युवकांनी निरोगी आरोग्याचा मंत्र आत्मसात करावा, असा प्रेरणादायी संदेश या स्पर्धेतून दिला जात आहे. मेहनतीच्या घामातून घडलेल्या शरीरयष्टींचा जलवा आणि किताब पटकाविण्यासाठी रंगणारी चुरस यामुळे ही स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
युवा शक्तीला बळ, व्यायामाला प्रतिष्ठा आणि शरीरसौष्ठवाला प्रोत्साहन… ‘भाजपा श्री’च्या माध्यमातून सावंतवाडीत फिटनेस संस्कृतीचा नवा हुंकार घुमू लागला आहे!



