लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य!, महिलांच्या स्वप्नांना व्यावसायिक भरारी देणारे व्यासपीठ काळाची गरज! : प्रभाकर सावंत. ; वेंगुर्ल्यातील भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाला भाजप जिल्हाध्यक्षांची भेट.

वेंगुर्ला : महिलांच्या हातातील कौशल्याला व्यावसायिक बळ, त्यांच्या कल्पकतेला बाजारपेठेची जोड आणि स्वावलंबनाच्या स्वप्नांना यशाची दिशा मिळवून देणे ही काळाची खरी गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महिला आज स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय उभे करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यांच्या या जिद्दीला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने वेंगुर्ल्यातील महिलांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन’ने महिलांसाठी निर्माण केलेले व्यावसायिक व्यासपीठ हा निश्चितच स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम आहे. अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक शहरात उभे राहावेत. त्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट, गृहउद्योजिका आणि नवउद्योजिकांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिलांच्या सर्जनशीलतेचा, कष्टाचा आणि उद्योजकीय आत्मविश्वासाचा सुरेख संगम असलेल्या या प्रदर्शनाला ३१ ऑक्टोबर रोजी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली.

या प्रदर्शनामध्ये महिलांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, विविध प्रकारची उत्पादने तसेच रुचकर खाद्यपदार्थांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या कल्पकतेला व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून होत आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पपू परब, वायंगणी उपसरपंच अनंत केळजी, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक भगत, बाळा सावंत, लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्ष ज्योती देसाई, सदस्य शुभदा नवार, दिपाली अभ्यंकर, काजल गिरप, इनरव्हील क्लबच्या ट्रेझरर वृंदा गवंडळकर, आरती गिरप, रसिका मठकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष पपू परब, उपसरपंच अनंत केळजी तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक भगत आणि बाळा सावंत यांचा इनरव्हील क्लब व लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कोकणातील उत्पादनांना मंत्रालयापर्यंत बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न!

कोकणातील महिलांनी तयार केलेल्या अस्सल स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळाली, तर त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळू शकते. याच दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या ठिकाणी महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रभाकर सावंत यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे महिला उद्योजिकांच्या व्यवसायाला स्थानिक बाजारपेठेपलीकडे मोठी संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसन्ना देसाई यांनी केले.

फोटोओळ : वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट देऊन महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची पाहणी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles