सावंतवाडी : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर माणसामाणसांना जोडणारा आपुलकीचा आणि श्रद्धेचा सेतू! याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश दर्शनाची आपली अनोखी परंपरा उत्साहात सुरू केली आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी सावंतवाडी शहरातील विविध भाग, कॉलनी परिसर तसेच नागरिकांच्या घरांना भेटी देत त्यांनी लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले.
विशेष म्हणजे, राजकीय पक्षांच्या भिंती ओलांडत सर्वसामान्य सावंतवाडीकरांच्या घरातील बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्याची विशाल परब यांची भूमिका यंदाही प्रकर्षाने जाणवली. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह अन्य राजकीय पक्षांतील कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील नागरिक आणि गणेशभक्तांच्या घरी जाऊन त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यामुळे त्यांच्या या गणेश दर्शन उपक्रमाला राजकीय चौकटीपलीकडची आपुलकीची आणि जिव्हाळ्याची किनार लाभली.
गेली अनेक वर्षे विशाल परब हे केवळ सावंतवाडी मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशभक्तांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. गतवर्षी त्यांनी तब्बल १३०० हून अधिक गणेशमूर्तींचे दर्शन घेण्याचा विक्रम केला होता. यंदा हा विक्रमही मागे टाकत गणरायाच्या आशीर्वादाने नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
पहिल्याच दिवशी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी विशाल परब यांच्या भेटीने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. घरातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी स्वतः युवा नेते आवर्जून घरी येतात, यामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
“पुढील नऊ दिवसांत जास्तीत जास्त गणेशभक्त, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येकाच्या सुख, समृद्धी, यश आणि आरोग्यासाठी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करणार आहे,” अशी भावना विशाल परब यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सावंतवाडी शहरातील विविध भागांत विशाल परब यांच्या गणेश दर्शन दौऱ्यादरम्यान भाजपचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाप्पाच्या दर्शनातून राजकारणापलीकडची नाती जपणारा हा उपक्रम… आणि घराघरांत पोहोचणारी आपुलकीची ही वारी… यंदा विशाल परब यांच्या गणेश दर्शनाच्या विक्रमाला किती उंचीवर घेऊन जाते, याकडे आता सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे!



