सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये गावाचे आदर्श युवा सरपंच गुणाजी गावडे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाच्या दर्शनासाठी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावत ‘गणराया मोरया’च्या जयघोषात भक्तिभावाने नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. गणरायाच्या चरणी माथा टेकवत मान्यवरांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंगलमय प्रार्थना केली.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद राऊळ, जि. प. सदस्य तथा भाजप सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, जि. प. सदस्य नितीन राऊळ, जि. प. सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच कास सरपंच प्रवीण पंडीत यांनी गावडे यांच्या निवासस्थानी भेट देत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
गणरायाच्या आगमनाने गावडे कुटुंबीयांचे निवासस्थान भक्ती, श्रद्धा आणि मंगलमय वातावरणाने उजळून निघाले आहे. त्यात मान्यवरांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीने या गणेशोत्सवाच्या आनंदाला जणू चार चाँद लागले. गणरायाच्या भक्तीमय वातावरणात झालेल्या या स्नेहभेटीत आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
यावेळी गावडे कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आणि आपुलकीने स्वागत करण्यात आले. गणरायाच्या दर्शनासोबतच झालेल्या या स्नेहभेटीमुळे गावडे कुटुंबीयांच्या आनंदात आणखी भर पडली.
भक्तीचा सुगंध, स्नेहाची उब आणि गणरायाच्या आशीर्वादाची अनुभूती देणारा हा मंगलमय क्षण वेत्ये गावाच्या गणेशोत्सवातील एक अविस्मरणीय सोहळा ठरला.



