सावंतवाडी : जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सांघिक खेळाच्या जोरावर श्री जनता विद्यालय तळवडेच्या लेकींनी कबड्डीच्या मैदानावर अक्षरशः विजयाची पताका फडकावली आहे! तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत विद्यालयाच्या १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार कामगिरीमुळे दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे दोन्ही संघ आता सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय आणि सावंतवाडी तालुका व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
१४ वर्षांखालील संघाची विजयी भरारी!
दि. १२ सप्टेंबर रोजी कळसूळकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेच्या संघाने अंतिम सामन्यात शानदार खेळ करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या विजयी संघात आराध्या तळवडेकर, समृद्धी आचरेकर, रुद्रा चौगुले, दिशा गावडे, खुशी नाईक, कीर्ती पेडणेकर, काव्या अमरे, इंद्रायणी रेडकर, आर्या नाईक, आरोही शिरोडकर आणि स्वरा सातार्डेकर यांनी दमदार सहभाग नोंदवला.
मैदानावरील प्रत्येक चढाई, बचाव आणि गुणासाठी केलेला संघर्ष यामुळे या लेकींनी आपल्या खेळाची ताकद दाखवून देत तालुक्यात अव्वल स्थान पटकावले.
१७ वर्षांखालील संघानेही दाखवली विजयी जिद्द!
दि. २६ सप्टेंबर रोजी श्री जनता विद्यालय तळवडे येथे झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेतही तळवडेच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत प्रथम क्रमांक पटकावला.
या संघात आर्या पावणोजी, आरुषी सावंत, अनुष्का कुंभार, साक्षी पेडणेकर, श्रुती जाधव, श्रावणी दळवी, वैष्णवी जाधव, मालविका गावडे, आर्या मांजरेकर, सानवी पावणोजी, शमिका परब आणि आर्या सावंत यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
एकाच विद्यालयाचे दोन संघ आणि दोन्ही संघांचे तालुकास्तरावर विजेतेपद, ही श्री जनता विद्यालय तळवडेच्या क्रीडा क्षेत्रातील निश्चितच अभिमानास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
आता जिल्हास्तरीय मैदान गाजविण्याचे आव्हान!
तालुकास्तरीय स्पर्धेतील या दैदिप्यमान यशामुळे १४ व १७ वर्षांखालील दोन्ही विजयी संघांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता तळवडेच्या या क्रीडापटू लेकी सावंतवाडी तालुक्याचा झेंडा जिल्हास्तरीय स्पर्धेत अभिमानाने फडकविण्यास सज्ज झाल्या आहेत.
या यशामागे विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दयांनद बांगर, विजय सोनवणे आणि शांताराम गवई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सराव, शिस्त, सांघिक भावना आणि खेळातील बारकावे यांचे योग्य मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थिनींच्या प्रतिभेला योग्य दिशा दिली.
तळवडेच्या लेकींच्या यशाचे सर्वत्र कौतुक!
विद्यालयाच्या मुलींनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींनी विजयी संघांचे अभिनंदन केले. तसेच आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
तालुक्यात विजयाचा झेंडा रोवून आता जिल्ह्याच्या मैदानाकडे तळवडेच्या लेकींची विजयी वाटचाल सुरू झाली आहे. त्यांच्या या झंझावाती कामगिरीकडे संपूर्ण सावंतवाडी तालुक्याच्या नजरा लागल्या असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही त्या दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



