सावंतवाडी : जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची आस असेल तर आर्थिक अडचणीही स्वप्नांच्या वाटेतील अडथळा ठरू नयेत, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या होतकरू विद्यार्थी ज्ञानेश गणेश नाईक याच्या पुढील शिक्षणासाठी २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

ज्ञानेश गणेश नाईक याने नीट परीक्षा उत्तीर्ण होत वैद्यकीय क्षेत्रातील पुढील शिक्षणाची वाटचाल सुरू केली आहे. पुणे येथील लोकमान्य होमिओपॅथी एसएमसी महाविद्यालय, चिंचवड येथे तो पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेत आहे. ज्ञानेश हा अत्यंत हुशार, मेहनती व होतकरू विद्यार्थी असून त्याला शिक्षणाची विशेष आवड आहे. मात्र, पुढील शिक्षणाचा खर्च भागविताना त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर ज्ञानेशने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे व शरदिनी बागवे यांच्याशी संपर्क साधला. विद्यार्थ्याची शिक्षणाची जिद्द आणि गुणवत्तेची दखल घेत शरदिनी बागवे यांनी वैयक्तिकरित्या १० हजार रुपये, तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने १० हजार रुपये, अशी एकूण २० हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे ज्ञानेशकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी ज्ञानेशला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, “ज्ञानेशने आपल्या कष्टातून मिळवलेल्या या संधीचे सोने करावे आणि भविष्यात यशस्वी होऊन समाजाची सेवा करावी,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमातून आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी समाजातील संवेदनशील व्यक्ती आणि संस्थांनी पुढे येण्याचा सकारात्मक संदेशही देण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, समीता बागवे, शरदिनी बागवे, रवी जाधव, विद्यार्थी ज्ञानेश नाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा दवळी उपस्थित होत्या.
“मदतीचा हात छोटा असला, तरी तो एखाद्याच्या मोठ्या स्वप्नांना बळ देऊ शकतो!”
ज्ञानेशच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नाला मिळालेली ही आर्थिक साथ सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.



