सावंतवाडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि एल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचे आव्हान पेलण्यासाठी आता मळगावच्या रणरागिणी मैदानात उतरल्या आहेत. पाण्याचे घटते स्रोत, खालावत चाललेली भूजल पातळी आणि भविष्यातील पाणीटंचाईचे संकट ओळखून मळगाव येथील महिलांनी जलसंवर्धनाचा वसा हाती घेतला आहे. गावाच्या जलसमृद्धीसाठी महिलांनी दाखविलेली ही एकजूट केवळ श्रमदानाचा आदर्श नसून, जलसाक्षरतेचा आणि सामूहिक लोकसहभागाचा प्रेरणादायी वस्तुपाठ ठरत आहे.
मळगाव येथील ज्योती ग्रामसंघांतर्गत कार्यरत असलेल्या जान्हवी, जागृती आणि लक्ष्मी या महिला समूहांनी मळगावमधील रेडकरवाडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. या उपक्रमाला रेडकरवाडीतील ग्रामस्थांसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांचेही या कामासाठी विशेष सहकार्य लाभले.
पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी महिलांचे श्रमदान! !
मळगाव परिसरात सध्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रेडकरवाडी येथील झरीच्या वरच्या भागात सिमेंटच्या पिशव्यांचा उपयोग करून वनराई बंधारा उभारण्यात आला. महिलांनी प्रत्यक्ष श्रमदानातून या उपक्रमाला गती दिली, तर ग्रामस्थांनी खांद्याला खांदा लावून त्यांना साथ दिली. सर्वांच्या एकजुटीतून हा बंधारा पूर्णत्वास गेला.
थेंब थेंब साठवून जलसमृद्धीचा मार्ग खुला करण्याचा हा प्रयत्न भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बंधाऱ्यामुळे झरीतील पाणी काही प्रमाणात अडवून त्याचा जमिनीत मुरण्याचा कालावधी वाढण्यास मदत होईल. परिणामी परिसरातील भूजल पुनर्भरणाला चालना मिळून जवळच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास हातभार लागू शकतो.
महिला सक्षमीकरणातून जलसंवर्धनाचा नवा आदर्श!
महिला बचत गट हे केवळ आर्थिक व्यवहारांचे माध्यम नसून, ग्रामविकासाचे प्रभावी केंद्रही ठरू शकतात, याची प्रचिती मळगावमधील या उपक्रमातून आली आहे. गावाच्या पाणीप्रश्नासाठी महिलांनी स्वतःहून पुढाकार घेतल्याने पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळत आहे.
दुष्काळाच्या संकटासमोर हतबल न होता सामूहिक प्रयत्नांतून त्यावर मात करण्याचा मळगावच्या महिलांनी दिलेला संदेश निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला कृतीची जोड देत मळगावच्या महिलांनी जलसंवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावात जलजागृती वाढण्याबरोबरच इतर गावांनाही अशा लोकसहभागी कामांची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



