सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यावर घोंगावणारे दुष्काळाचे सावट दूर होऊन कोकणातील बळीराजाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सुबत्ता नांदू दे, शेतकऱ्यांना संकटांशी दोन हात करण्याचे बळ मिळू दे, अशी आर्त प्रार्थना सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी नवदुर्गेच्या चरणी केली. कोलगाव-पांडवनगरी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातेचे दर्शन घेत त्यांनी जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी देवीला साकडे घातले.

ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपल्या सुविद्य पत्नी सौ. अनघा निरवडेकर यांच्यासमवेत कोलगाव-पांडवनगरी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी नवदुर्गेचे दर्शन घेतले, आरती केली आणि जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि दुष्काळाच्या संभाव्य संकटामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळावा, त्याच्या कष्टाला यशाची जोड मिळावी आणि कोकणभूमी पुन्हा एकदा समृद्धीने बहरून यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान मंडळाच्या वतीने ॲड. निरवडेकर व सौ. अनघा निरवडेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे गटनेते बाबुराव चव्हाण यांनीही देवीच्या चरणी गाऱ्हाणे घालत ॲड. अनिल निरवडेकर यांना भविष्यात मोठी पदे आणि जनसेवेच्या व्यापक संधी मिळाव्यात, अशी प्रार्थना केली.
नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सागर चव्हाण, कार्याध्यक्ष विजय चव्हाण यांच्यासह मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कोलगाव-पांडवनगरी येथील नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात सुरू आहे.
भक्तीच्या या मंगल सोहळ्यातून जनकल्याणाची भावना व्यक्त होत असतानाच, बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी नवदुर्गेच्या चरणी घातलेले साकडे हे कोकणवासीयांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक ठरले आहे.



