राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बेळगावच्या प्रणाली बर्डे अव्वल. ; भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लेच्या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ला : भंडारी समाजाचा इतिहास लेखनातून उजेडात आणण्यासह मराठी साहित्याची अभिरुची वाढविणे आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत बेळगावच्या प्रणाली तेजस बर्डे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. राज्याच्या विविध भागांतून एकूण २६ निबंध प्राप्त झाले.

स्पर्धेत दापोली येथील परीक्षित चंद्रकांत दाभोलकर यांनी द्वितीय, तर मुंबई येथील दिलीप आत्माराम वायंगणकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कोल्हापूरच्या वैशाली ईश्वरराव माळी यांनी, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक सावंतवाडीच्या स्वरा श्रीहरी राऊळ यांनी पटकावला.

ज्येष्ठ साहित्यिका तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्या वृंदा कांबळी आणि प्रा. डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. निबंधांमधील विषयाची मांडणी, आकलन आणि भाषिक कौशल्याच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.
मराठी भाषेची जोपासना, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि भंडारी समाजाच्या इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्यभरातून मिळालेला प्रतिसाद मंडळाच्या साहित्यिक उपक्रमाला बळ देणारा ठरला.
मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या लेखकांचे आभार मानून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मंडळाचे पदाधिकारी व संचालक मंडळानेही विजेत्यांचे अभिनंदन केले. भविष्यातही साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून वाचन-लेखन संस्कृतीला चालना देण्याचा मानस मंडळाने व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles