सावंतवाडीच्या शैक्षणिक वैभवाला नवी झळाळी! – आमदार दीपक केसरकरांच्या पुढाकारातून सुधाताई कामत शाळेच्या नूतन इमारतीच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दमदार पाऊल! ; भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न. ; दर्जेदार इमारत उभारण्याचा मान्यवरांचा निर्धार, शाळेच्या गुणवत्तेचा सर्वांनाच अभिमान!

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : विद्येच्या मंदिराला नवे रूप, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी भरारी आणि सावंतवाडीच्या शैक्षणिक वैभवाला विकासाची नवी झळाळी देणाऱ्या कै. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक पीएम श्री शाळा, सावंतवाडी नं. २ च्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या उत्साहात आणि दिमाखात प्रारंभ झाला. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे शाळेच्या विकासाच्या नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या शाळेची नूतन इमारत लवकरात लवकर उभी राहावी, विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण आणि दर्जेदार भौतिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

 

या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, नगरपरिषद शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ‘शाळेच्या प्रगतीसाठी जे जे आवश्यक, ते सर्व करू!’ – माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर

यावेळी बोलताना माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सुधाताई कामत शाळेच्या विकासाबाबत आपली ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले की, शाळेची सुंदर आणि दर्जेदार इमारत लवकरात लवकर उभी राहण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देणे आणि शाळांना आवश्यक सुविधा मिळवून देणे, यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

सुधाताई कामत शाळेच्या प्रगतीसाठी जे जे काही आवश्यक असेल, ते उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असा विश्वासही आमदार केसरकर यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला बळ देणारी ही इमारत लवकर उभी राहावी, हीच अपेक्षा व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

आमदार केसरकर यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे शाळेच्या नूतन इमारतीच्या उभारणीबाबत उपस्थित पालक आणि नागरिकांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले.

दर्जेदार इमारतीबाबत कोणतीही तडजोड नाही! – प्रमोद कामत

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करताना नूतन इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, सुधाताई कामत शाळा नं. २ च्या विकासामध्ये अनेकांचे मोलाचे योगदान आहे. या शाळेत अनेकदा येण्याचा योग आला असून, येथील शैक्षणिक प्रगती आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता नेहमीच अभिमानास्पद वाटते.

शाळेची गुणवत्ता वाखाणण्याजोगी असून तिच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. नूतन इमारतीचे बांधकाम दर्जेदार व्हावे आणि त्यामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, याकडे विशेष लक्ष दिले जाईल. कंत्राटदारानेही कामाला गती देऊन इमारत लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

शाळेचा अभिमान जिल्ह्यापुरता मर्यादित नाही! – प्रितेश राऊळ

जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी सुधाताई कामत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव केला. या शाळेचा अभिमान संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यालाही आहे. शाळेने सातत्याने गुणवत्ता जपली असून, नूतन इमारत लवकरात लवकर उभी राहण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद काम केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिक्षणातून घडणार उद्याचे सुजाण नागरिक! – नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले

सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना आदर्श आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी शिक्षणप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांनी हा दिवस सावंतवाडी शहरासाठी ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण असल्याची भावना व्यक्त केली. शिक्षण हे मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे साधन असून, सुजाण नागरिक घडविण्यासाठी त्याची भूमिका मोलाची आहे. सुधाताई कामत शाळेच्या विकासासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मान्यवरांची उपस्थिती; शाळेच्या विकासासाठी एकजुटीचा संकल्प –

 

या भूमिपूजन सोहळ्याला नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका दुलारी रांगणेकर, बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष भारती मोरे, केंद्रप्रमुख श्री. ठाकूर, सुरज परब, सामाजिक कार्यकर्ते नंदू गावडे, आबा केसरकर, माजी केंद्रप्रमुख म. ल. देसाई, पालक अनंत जाधव यांच्यासह अन्य पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुधाताई कामत शाळेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाने केवळ एका वास्तूच्या उभारणीचा प्रारंभ झाला नाही, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने एक आश्वासक पाऊल पडले आहे. ज्ञानाची परंपरा, गुणवत्तेचा वारसा आणि आधुनिक सुविधांची जोड या त्रिसूत्रीच्या बळावर ही शाळा भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा या सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles