१२१ वर्षांच्या परंपरेचा सन्मान की पुरस्कार वितरणाचा अवमान?, सालईवाडा गणेशोत्सव मंडळ सांस्कृतिक मंत्रालयाच्या नियोजनावर नाराज. ; जिल्हास्तरावरील पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्याची मागणी!, ६०० किलोमीटरचा प्रवास करूनही सन्मान सोहळ्यात आयोजकांची घिसाडघाई! ; यंदाचा पुरस्कार दिवंगत अध्यक्ष राजा स्वार यांना समर्पित.

सावंतवाडी :  येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा या १२१ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या मंडळाने महाराष्ट्र राज्याच्या ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मात्र, या यशाच्या आनंदावर पुरस्कार वितरण सोहळ्यातील कथित नियोजनशून्यतेचे विरजण पडल्याची खंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आदल्या दिवशी फोन करून मुंबईत बोलावणे, ६०० किलोमीटरचा प्रवास करूनही घाईगडबडीत पुरस्कार वितरणाचा अनुभव येणे, ही बाब मनाला खटकणारी आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्ह्यातच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करावेत, अशी ठाम मागणी मंडळाने पत्रकार परिषदेत केली.

राज्य शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा विविध स्तरांवर गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा, सावंतवाडी यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे होते.

मात्र, पुरस्कार वितरणाच्या आयोजनाबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी तीन वेळा या स्पर्धेत मंडळाला पुरस्कार मिळाले असून, पूर्वीच्या सोहळ्यांमध्ये असा अनुभव आला नव्हता, असे त्यांनी नमूद केले.

‘जिल्ह्यातील पुरस्कारांसाठी मुंबईची वारी कशाला?’ — अमरनाथ सावंत

मंडळाचे उपाध्यक्ष अमरनाथ सावंत म्हणाले की, आदल्या दिवशी फोन करून मुंबईत पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठावी लागली. एवढा लांबचा प्रवास करूनही पुरस्कार वितरणाच्या वेळी अपेक्षित सन्मान आणि नियोजन दिसून आले नाही, ही बाब खटकणारी होती.

यापूर्वी माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना असा अनुभव आला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. मंत्र्यांना वेळ उपलब्ध नव्हता, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. मात्र, वेळेची अडचण होती, तर कार्यक्रमाची तारीख बदलून नियोजनबद्ध पद्धतीने सोहळा आयोजित करणे अपेक्षित होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठी मंडळांना मुंबईत बोलावण्याऐवजी पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावेत आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातच त्यांचे वितरण करावे. त्यामुळे मंडळांचा प्रवासखर्च, वेळ आणि होणारा त्रास वाचेल. आयोजकांनी भविष्यात अशा कार्यक्रमांचे नियोजन करताना या बाबींचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी सावंत यांनी केली.

‘१२१ वर्षांच्या परंपरेचा विचार व्हायला हवा!’ — राजू भाट

उत्सव समितीचे अध्यक्ष राजू भाट यांनीही पुरस्कार वितरणाच्या व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आमच्या मंडळाला १२१ वर्षांची परंपरा आहे. गेली पाच वर्षे आम्ही या स्पर्धेत सहभागी होत असून, तीन वेळा पुरस्कार मिळविण्याचा मान मंडळाला मिळाला आहे. मात्र, यंदा सांस्कृतिक मंत्रालयाच्या आयोजनात घिसाडघाई झाल्याचे जाणवले. लांबून प्रवास करून आलेल्या इतर मंडळांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.

कार्यक्रम संपताच सभागृहातील दिवे बंद करण्यात आल्याने उपस्थितांना आणखी गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संबंधित असतानाही कार्यक्रमातील गोंधळामुळे त्यांच्याशी संवाद साधणे शक्य झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या अनुभवाचा विचार करून भविष्यात पुरस्कार वितरण अधिक सन्मानपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यंदाचा पुरस्कार दिवंगत अध्यक्ष राजा स्वार यांना समर्पित

या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या काळात मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार यांचे निधन झाले होते. त्यांनी तब्बल ४५ वर्षे मंडळासाठी योगदान देत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला अभिवादन म्हणून यंदाचा पुरस्कार त्यांना समर्पित करत असल्याचे राजू भाट यांनी भावनिक शब्दांत स्पष्ट केले.

१२१ वर्षांची परंपरा जपत मंडळाने मिळविलेला हा सन्मान दिवंगत अध्यक्षांच्या स्मृतींना वाहिलेली आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

२१ दिवसांच्या उत्सवापुरते नव्हे, वर्षभर सामाजिक कार्य!

मंडळाचे सचिव साबाजी नार्वेकर यांनी पुरस्काराबद्दल सर्व गणेशभक्त, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, मंडळाला १२१ वर्षांची परंपरा असून मंडळाची स्वतःची इमारत आहे. या इमारतीतील नवीन सभागृहासाठी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्याबद्दल त्यांनी केसरकर यांचे आभार मानले आणि त्यांचे सहकार्य नेहमीच लाभत असल्याचे सांगितले.

मंडळाचे कार्य केवळ गणेशोत्सवाच्या २१ दिवसांपुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जातो. त्यामुळे स्पर्धांमध्ये मंडळांचे मूल्यमापन करताना त्यांच्या सामाजिक योगदानाचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा नार्वेकर यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष अमरनाथ सावंत, सचिव साबाजी नार्वेकर, उत्सव समिती अध्यक्ष राजू भाट, खजिनदार शिवप्रसाद बांदेकर, प्रतीक बांदेकर, सायली बांदेकर, विनोद सावंत, सुकन्या टोपले, प्रवीण मोरजकर, आबा पडते, कल्पना बांदेकर, मनोज सावंत, संतोष खानविलकर, प्रसाद नार्वेकर, अपर्णा भाट, मंगेश नानचे आदी उपस्थित होते.

पुरस्कार हा केवळ मानचिन्ह नसतो, तर अनेक वर्षांच्या परंपरेचा, सांस्कृतिक योगदानाचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा सन्मान असतो. त्यामुळे अशा पुरस्कार वितरण सोहळ्यांत नियोजन, वेळेचे भान आणि सन्मानाची जपणूक यांना प्राधान्य मिळावे, ही सालईवाडा गणेशोत्सव मंडळाची मागणी आता आयोजक कितपत गांभीर्याने घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles