दोडामार्ग : जिद्दीला कष्टांची जोड, मेहनतीला चिकाटीची साथ आणि ध्येयाला अथक प्रयत्नांचे बळ लाभले की यशाचे शिखर गाठता येते, हे कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थिनी कु. सुचित्रा सोमनाथ गोंधळी हिने सिद्ध करून दाखविले आहे. राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा व राज्य निवड चाचणीत उल्लेखनीय कामगिरी करत तिची पंजाबमधील चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघात निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे कुडासेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा व राज्य निवड चाचणीतून सुचित्राने आपल्या गुणवत्तेची आणि खेळातील कौशल्याची प्रभावी छाप पाडली. तिच्या या निवडीने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. आता चंदीगडच्या मैदानावर आपल्या खेळाची चमक दाखविण्यासाठी ती सज्ज झाली आहे.
ग्रामीण भागातून राष्ट्रीय क्रीडा क्षितिजापर्यंत झेप!
बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कुडासे या प्रशालेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. मर्यादित भौतिक सुविधा आणि ग्रामीण परिसरातील आव्हानांवर मात करत या प्रशालेने आजवर २७ राष्ट्रीय आणि ११० राज्यस्तरीय खेळाडू घडविण्याचा गौरवशाली टप्पा गाठला आहे. सुचित्राची राष्ट्रीय संघातील निवड ही या क्रीडापरंपरेतील आणखी एक अभिमानास्पद उपलब्धी ठरली आहे.
क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्य यांचे दर्शन सुचित्राच्या कामगिरीतून घडले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातील अन्य विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
संस्थेकडून अभिनंदनाचा वर्षाव!
सुचित्राच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शालेय समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघ तसेच कुडासे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.
सुचित्राच्या या यशामुळे कुडासेच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, राष्ट्रीय स्पर्धेतही ती दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. कुडासेच्या मातीतून उगवलेली ही क्रीडाप्रतिभा राष्ट्रीय मैदानावर महाराष्ट्राच्या यशाचा ध्वज फडकवो, अशा शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर होत आहे.



