सावंतवाडी : नागरिकांना स्वच्छ पाणी देणे ही नगरपरिषदेची मूलभूत जबाबदारी; मात्र सावंतवाडीतील सालईवाडा परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये ड्रेनेजचे अशुद्ध पाणी मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घराघरांत नळाद्वारे येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबतच शंका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळण्याचा प्रकार हा केवळ तांत्रिक दोष नसून नागरिकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर प्रश्न आहे, अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नगरपरिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पाइपलाइनचे नकाशे कुठे? नियोजनाचा अभाव नागरिकांच्या मुळावर!
सावंतवाडी शहरातील जुन्या पाइपलाइन नेमक्या कुठून गेल्या आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे आणि विविध विकासकामांदरम्यान त्यांचे नुकसान झाले आहे का, याबाबत नगरपरिषदेकडे स्पष्ट नकाशे व नियोजन उपलब्ध नसल्याचा आरोप संजू परब यांनी केला. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी दूर करताना प्रशासनाची कसोटी लागणे अपेक्षित असताना, नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
उपवनसंरक्षक कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयासमोर खोदून ठेवलेल्या पाइपलाइनच्या कामाचाही त्यांनी समाचार घेतला. विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदायचे आणि त्यानंतर कामे अर्धवट सोडून नागरिकांना त्रास सहन करायला लावायचा, हा प्रकार थांबला पाहिजे. संबंधित कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
५७ कोटींची पाणी योजना; तरीही नागरिकांच्या नळाला अशुद्ध पाणी?
शहरात ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (MNGL) गॅस पाइपलाइनसाठीही विविध ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, ही कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची पूर्ववत दुरुस्ती आणि डागडुजी करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे.
एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची चर्चा आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत तक्रारी, अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेतील दोष तातडीने शोधून काढणे, पाइपलाइनची तपासणी करणे आणि नागरिकांना सुरक्षित पाणी मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्ते खोदले, खड्डे पडले; आता तरी डांबरीकरण करा!
पाणीपुरवठा आणि गॅस पाइपलाइनच्या कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांची योग्य दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे आणि चर निर्माण झाले आहेत. परिणामी वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार आहे.
पावसाळा संपल्यानंतरही रस्त्यांची दुरुस्ती रखडणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत. नागरिकांना खराब रस्ते आणि अशुद्ध पाणी अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपरिषदेने जबाबदारीने काम करावे, अशी मागणी संजू परब यांनी केली.
प्रत्यक्ष पाहणी; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी –
दरम्यान, गॅस पाइपलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पुन्हा खोदाई करून ड्रेनेज पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाची स्थानिक नगरसेविका सुकन्या टोपले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील ज्ञानेश्वर पाटकर, ओंकार सावंत, शाम रेमुळकर, अथर्व सावंत, विनोद सावंत, प्रवीण मोरजकर, राजू भाट, अमित आरवारी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा आंदोलनाचा भडका!
सालईवाड्यातील अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पाण्याची गुणवत्ता तपासावी, पाइपलाइनमधील दोष शोधून दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर रखडलेली कामे पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असताना प्रशासनाने आणखी किती काळ प्रतीक्षा करायला लावायची? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या समस्येवर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
आता नगरपरिषद प्रशासन या गंभीर तक्रारींची किती तत्परतेने दखल घेते आणि सालईवाड्यातील नागरिकांना स्वच्छ पाणी व सुरक्षित रस्ते कधी मिळतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



