सावंतवाडीच्या वैभवाचे ‘प्रतीक’ वाचणार कधी?, मोती तलावाचा ‘शेवटचा श्वास’, दुर्गंधीच्या विळख्यात ऐतिहासिक जलवैभव! ; सत्ताधारी अन् प्रशासनाच्या दुर्लक्षावर संजू परबांचा घणाघात! ; सहा महिन्यांपासून तक्रारी करूनही कारवाईचा पत्ता नाही, ड्रेनेजचे पाणी तलावात सोडणाऱ्यांवर कारवाई करा! ; मोती तलावाच्या संवर्धनासाठी आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणेंना साकडे घालणार!

सावंतवाडी : सावंतवाडी शहराचे सौंदर्य, ऐतिहासिक वैभव आणि सांस्कृतिक ओळख जपणारा मोती तलाव आज दुर्गंधीच्या विळख्यात अडकला असून, त्याच्या अस्तित्वावरच संकटाचे ढग दाटू लागले आहेत. एकेकाळी पोहण्याच्या स्पर्धांनी गजबजणारा आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला हा तलाव आज सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे आपले नैसर्गिक सौंदर्य गमावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. “मोती तलाव शेवटच्या घटका मोजतोय; सहा महिन्यांपासून ओरडून सांगतोय, पत्रव्यवहारही केला; मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे,” अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी नगरपरिषद प्रशासनावर जोरदार निशाणा साधला.

मोती तलावात मिसळणारे ड्रेनेजचे पाणी तातडीने बंद करून तलावाचे प्रदूषण रोखावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.

नोटिसांचा फार्स की प्रदूषणावर प्रत्यक्ष कारवाई?

मोती तलावाच्या दुरवस्थेबाबत गेल्या सहा महिन्यांपासून आपण नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, यासंदर्भात लेखी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, प्रत्येक वेळी प्रशासनाकडून नोटिसा दिल्याचे उत्तर मिळते. प्रत्यक्षात तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना झाल्याचे दिसत नसल्याची टीका संजू परब यांनी केली.

वीस वर्षांपूर्वी याच मोती तलावात पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. तलावातील पाण्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक येत होते. मात्र, आज तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने त्याच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जलसंपत्तीची अशी दुरवस्था होत असताना नगरपरिषदेचा आरोग्य विभाग नेमकी कोणती भूमिका बजावत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रामेश्वर प्लाझा, सालईवाड्यातील इमारतींचे सांडपाणी तलावात?

संजू परब यांनी केलेल्या आरोपानुसार, रामेश्वर प्लाझाचे ड्रेनेजचे पाणी तसेच सालईवाडा परिसरातील काही इमारतींचे सांडपाणी मोती तलावात सोडले जात आहे. याशिवाय मिलाग्रीस शाळेकडून येणाऱ्या ओहोळातूनही घाण तलावात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या सर्व बाबींकडे वारंवार लक्ष वेधूनही केवळ नोटिसा देण्यापलीकडे ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तलावात सांडपाणी मिसळण्याचे मार्ग शोधून ते तातडीने बंद करणे, प्रदूषणाच्या स्रोतांची तपासणी करणे आणि तलावाच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोती तलाव वाचवण्यासाठी आता वरिष्ठ नेत्यांना साकडे!

मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व आणि सावंतवाडीच्या सौंदर्यातील त्याचे स्थान लक्षात घेता, त्याच्या संवर्धनासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे संजू परब यांनी सांगितले. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तलावात येणारे सांडपाणी रोखणे, प्रदूषणाच्या स्रोतांवर नियंत्रण आणणे आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीच्या वैभवाचे ‘प्रतीक’ वाचणार कधी?

मोती तलाव हा केवळ पाण्याचा साठा नसून सावंतवाडीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. अशा तलावात सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारी समोर येणे ही चिंतेची बाब आहे. केवळ नोटिसा बजावून प्रश्न सुटणार नाही; तर प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्यक्ष आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मोती तलावाचे सौंदर्य पुन्हा खुलणार की दुर्गंधीच्या विळख्यात त्याचे वैभव हरवणार? हा प्रश्न आता सावंतवाडीकरांसमोर उभा ठाकला आहे. ऐतिहासिक जलवैभवाचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles