सम्राट क्लबच्या सुरांच्या मैफलीत जयेश जाधव यांची बाजी!,  सावंतवाडीतील जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव अव्वल तर रवींद्र प्रभू उपविजेते; २२ गायक-गायिकांच्या सुरेल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!

सावंतवाडी : सूरांची बरसात, सुरेल स्वरांची मोहिनी आणि जुन्या सदाबहार गीतांचा अविस्मरणीय नाद… अशा संगीतमय वातावरणात सावंतवाडीतील माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिर परिसरात रंगलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव यांनी आपल्या दमदार गायनाने प्रथम क्रमांक पटकावला. तर रविंद्र प्रभू यांनी आपल्या सुरेल सादरीकरणाच्या जोरावर उपविजेतेपदाला गवसणी घातली. प्रशांत हळदणकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. जुन्या हिंदी गीतांच्या सुरेल मैफलीने रसिकांच्या मनाचा ठाव घेत ही स्पर्धा रंगतदार ठरली.

सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्या प्रांगणात या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या २२ गायक-गायिकांनी आपल्या गायनकलेचे दर्शन घडवत स्पर्धेत रंग भरले. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या आवाजातील गोडवा, सुरांची अचूकता आणि भावपूर्ण सादरीकरणातून रसिकांची दाद मिळविण्याचा प्रयत्न केला.

 ‘सोचेंगे तुम्हें प्यार करे के नही…’ने जयेश जाधव यांची विजयी भरारी!

स्पर्धेतील अंतिम फेरीत जयेश जाधव (स्पर्धक क्रमांक ८) यांनी ‘सोचेंगे तुम्हें प्यार करे के नही…’ हे लोकप्रिय गीत आपल्या सुरेल आवाजात सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला परीक्षकांकडून ३०० पैकी तब्बल २३३ गुण मिळाले आणि त्यांनी प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशाने स्पर्धेतील विजेतेपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

दुसरीकडे, रविंद्र प्रभू (स्पर्धक क्रमांक १४) यांनी ‘तेरे आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है…’ या अजरामर गीताच्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी २३२ गुण मिळवत अवघ्या एका गुणाच्या फरकाने उपविजेतेपद पटकावले. त्यामुळे स्पर्धेतील पहिल्या दोन क्रमांकांमधील चुरस विशेष लक्षवेधी ठरली.

प्रशांत हळदणकर (स्पर्धक क्रमांक ५) यांनी ‘चेहरा है या चाँद खिला…’ या गीताचे भावपूर्ण सादरीकरण करत २१२ गुण मिळवले आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.

उत्तेजनार्थ पारितोषिकांनीही खुलवली सुरांची मैफल!

स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. सानिका सासोलकर (स्पर्धक क्रमांक ९) हिने ‘मेरे ख्वाबों में जो आये…’ हे गीत सादर करत २११ गुणांसह पटकावले. तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नेत्रा हर्षल भांगले (स्पर्धक क्रमांक १२) हिने ‘बाबुजी धीरे चलना…’ या गीताच्या सादरीकरणातून २०५ गुण मिळवत आपल्या नावावर केले.

या सर्व विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गायक-गायिकांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले, तर संगीतप्रेमींना जुन्या हिंदी गीतांच्या आठवणींमध्ये रमण्याची संधी मिळाली.

 दीपप्रज्वलनाने सुरेल पर्वाचा शुभारंभ!

स्पर्धेचे उद्घाटन सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अंतिम फेरीत दाखल झालेल्या सर्व स्पर्धकांनी आत्मविश्वासाने आणि कलात्मकतेने गायन सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सम्राट क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव प्रतिभा चव्हाण, कौस्तुभ पेडणेकर, डॉ. सोनल लेले, गुरुप्रसाद चिटणीस, माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गावडे, संतोष सावंत, दिलीप सांगावकर, बबलू मिशाळ, वैभव केंकरे, अमिषा सासोलकर, लक्ष्मीकांत सासोलकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुभवी परीक्षकांकडून गुणांची पारख –

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीत विशारद ॲड. सिद्धी परब, सौ. स्मिता केंकरे आणि कु. श्रुती सावंत यांनी काम पाहिले. स्पर्धकांच्या गायनातील सूर, ताल, लय आणि सादरीकरण यांचे परीक्षण करून त्यांनी गुणांकन केले.

कार्यक्रमाचे सुटसुटीत, प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन गुरुप्रसाद चिटणीस यांनी केले. त्यांनीच आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

एकंदरीत, माठेवाड्यातील या सुरेल मैफलीने सावंतवाडीच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक सुंदर स्वर जोडला. स्पर्धेतील चुरस, गायकांची मेहनत आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद यामुळे ही जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धा संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय पर्व ठरली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles