सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक ॲड. नकुल पार्सेकर यांच्या साहित्यिक वाटचालीचा वेध घेणारी ‘शब्दांच्या वाटेवर’ ही विशेष मुलाखत मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. अर्ध्या तासाच्या या विशेष कार्यक्रमातून अॅड. पार्सेकर यांच्या आजवरच्या साहित्यप्रवासातील विविध टप्पे, साहित्यनिर्मितीमागील प्रेरणा आणि त्यांच्या साहित्यिक वाटचालीचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मिती प्रमुख श्री. राजेश दळवी यांच्या संकल्पनेतून या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. दूरदर्शनच्या अधिकारी सौ. रश्मी समर्थ यांनी मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रम प्रसारण अधिकारी श्रीमती वनिता गौंडाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलाखत घेतली आहे.
या कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन निवेदिका श्रीमती रेश्मा उपासे यांनी केले असून, व्हिडिओ चित्रीकरणाची जबाबदारी श्री. गौरव जाधव यांनी सांभाळली आहे.
सामाजिक बांधिलकी आणि साहित्यिक योगदान यांचा सुंदर संगम साधणाऱ्या अॅड. नकुल पार्सेकर यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या साहित्यिक प्रवासातील अनुभव, विचार आणि शब्दांशी जुळलेले नाते जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे साहित्यप्रेमी आणि वाचनसंस्कृती जपणाऱ्या रसिकांसाठी हा कार्यक्रम विशेष पर्वणी ठरणार आहे.
प्रसारण तपशील :
- कार्यक्रम : शब्दांच्या वाटेवर
- मुलाखत : ॲड. नकुल पार्सेकर
- दिनांक : मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६
- वेळ : रात्री ९ वाजता
- वाहिनी : डी.डी. सह्याद्री.



