सांस्कृतिक सत्ता ही सर्व सत्तांची जननी!, विचारांची क्रांतीच समाजपरिवर्तनाचा खरा मार्ग! ; सावंतवाडीच्या समता प्रेरणाभूमीवर धम्मसंगिनी रमा गोरख यांचे परखड प्रतिपादन. ; महामानवांच्या स्मारकांतून त्यांच्या विचारांचा जागर व्हावा, सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी.

✍️मोहन जाधव.

सावंतवाडी : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारी स्मारके केवळ दगड-विटांच्या वास्तू बनून राहू नयेत, तर ती सामाजिक परिवर्तनाची प्रेरणास्थळे आणि क्रांतिकारी विचारांची विद्यापीठे बनली पाहिजेत. महामानवांच्या स्मारकांच्या उभारणीबरोबरच त्यांच्या विचारांचे जतन, संवर्धन आणि कृतीशील आचरण होणे आवश्यक आहे. सांस्कृतिक सत्ता ही सर्व सत्तांची सत्ता असून, विचारांची सत्ता आणि परिवर्तनवादी सांस्कृतिक जाणीव निर्माण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती साकार होऊ शकत नाही, असे परखड प्रतिपादन आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासक धम्मसंगिनी रमा गोरख यांनी केले.

सावंतवाडी येथील समता प्रेरणाभूमीच्या वतीने आयोजित स्मृती परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता प्रेरणाभूमीचे अध्यक्ष डी. के. पडेलकर होते, तर सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी विचारांच्या संगमाने या परिषदेला वैचारिक अधिष्ठान लाभले.

बौद्ध वारशाने उलगडला इतिहासाचा गौरवशाली पट!

भारतातील प्राचीन बौद्ध सांस्कृतिक वारशाचा संदर्भ देताना धम्मसंगिनी रमा गोरख म्हणाल्या की, आपल्या पूर्वजांनी घडविलेली बौद्ध शिल्पकला, स्तूप आणि ऐतिहासिक स्मारके ही अडीच हजार वर्षांपूर्वीच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची साक्ष देतात. या वास्तूंमधून भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व आजच्या पिढीसमोर उलगडते.

ब्रिटिश काळात पुरातत्त्वीय संशोधनाच्या माध्यमातून अनेक बौद्ध स्थळे आणि ऐतिहासिक अवशेष जगासमोर आले. पाली व सिंहली भाषांतील साहित्याच्या अभ्यासातून प्राचीन इतिहासाचे अनेक दुवे जोडले गेले. भगवान गौतम बुद्ध हे केवळ काल्पनिक व्यक्तिमत्त्व नसून ऐतिहासिक महापुरुष होते, याची जाणीव आधुनिक संशोधनातून अधिक ठळक झाली, असे त्यांनी नमूद केले.

स्मारकांच्या पायथ्याशी महामानवांचे विचार गाडले जाऊ नयेत!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशभर उभारल्या जाणाऱ्या स्मारकांविषयी भूमिका मांडताना त्या म्हणाल्या, की स्मारके उभी राहिली पाहिजेत; मात्र त्या स्मारकांमधून संबंधित महामानवांचे विचार, त्यांचे सामाजिक-आर्थिक व्हिजन आणि त्यांनी दाखविलेला परिवर्तनाचा मार्गही पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.

महापुरुषांच्या स्मारकांकडे पाहताना त्यांच्या क्रांतिकारी कार्याची, संघर्षाची आणि समाजाला दिलेल्या दिशेची आठवण झाली पाहिजे. केवळ वास्तू उभारून कर्तव्य संपत नाही. त्या विचारांचे रूपांतर सामाजिक कृतीत, आर्थिक सक्षमीकरणात आणि सांस्कृतिक धोरणांत झाले पाहिजे. महामानवांचे विचार स्मारकांच्या पायथ्याशी गाडले जाणार नाहीत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

बाबासाहेबांची धम्मक्रांती ही सामाजिक परिवर्तनाबरोबरच आर्थिक आणि राजकीय क्रांतीची प्रेरणा देणारी होती. क्रांती घडविण्यासाठी वैचारिक समज, ठाम बांधिलकी आणि वेळ देण्याची तयारी आवश्यक असते. स्मारके समाजाच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय सक्षमीकरणाला पूरक ठरली, तरच त्यांच्या उभारणीचे सार्थक होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आजचे खोत कोण?’ संसाधनांवरील मालकी कष्टकऱ्यांचीच हवी!

खोतीविरोधी आंदोलनाचा संदर्भ देत धम्मसंगिनी रमा गोरख यांनी संसाधनांच्या मालकीचा प्रश्न अधोरेखित केला. जमीन कसणाऱ्यांच्या मालकीची असावी आणि उत्पादनासाठी कष्ट करणाऱ्यांना त्यांच्या श्रमाचा न्याय्य अधिकार मिळावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेची मध्यवर्ती दिशा होती. संसाधनांवर मोजक्या लोकांची एकाधिकारशाही असू नये, हा त्यामागील सामाजिक न्यायाचा विचार होता.

आजच्या काळात खोतांची परिभाषा बदलली असून, आधुनिक व्यवस्थेत संसाधनांवर वर्चस्व गाजवणारे नवे घटक कोण आहेत, हे समाजाने ओळखले पाहिजे. स्मारकांच्या निमित्ताने केवळ इतिहासाचे स्मरण न करता सांस्कृतिक आणि भौतिक राजकारणाचे भानही विकसित झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

संस्कृती ही समाजाला सत्तेपर्यंत आणि परिवर्तनापर्यंत घेऊन जाणारी महत्त्वाची शक्ती आहे. मात्र, संस्कृतीकरणाच्या नावाखाली केवळ पूजाअर्चेत गुंतून मूळ सामाजिक लढा विसरला, तर पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने वाटचाल होण्याचा धोका आहे. त्यामुळे महामानवांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवूनच सांस्कृतिक चळवळीची उभारणी झाली पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

प्रेरणाभूमीच्या विकासासाठी नगरपरिषदेचे सहकार्य!

कार्यक्रमाचे विशेष अतिथी ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे आणि प्रेरणेमुळेच आपल्याला सार्वजनिक जीवनात काम करण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त केली. महामानवांशी संबंधित सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांचा विकास करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडीतील समता प्रेरणाभूमीच्या विकासासाठी आपण वैयक्तिक स्तरावर तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रेरणाभूमीच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून ठेवल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी संस्थेच्या वतीने उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांना निवेदन सादर करण्यात आले. सध्या स्मारकाचे स्वरूप असलेल्या या परिसराचा विकास करून तो परिवर्तनवादी चळवळीचे संस्मरणीय केंद्र बनविण्यात यावे. यासाठी येथे बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

संदीप कदम, सूर्यकांत कदम, संजय कदम, मिलिंद माटे, रवीकिशोर चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही आपल्या शुभेच्छापर मनोगतातून समता प्रेरणाभूमीच्या कार्याचे कौतुक केले.

महामानवांच्या विचारांना अभिवादनाने परिषदेचा प्रारंभ!

परिषदेच्या प्रारंभी समाजमंदिर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विशेष अतिथी, मान्यवर आणि समता प्रेरणाभूमीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रेरणाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रेरणाभूमीच्या सल्लागार ममता जाधव, मीनल जाधव, प्रज्ञा जाधव, मीनाक्षी जाधव आणि आर्या जाधव यांनी स्वागतगीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. संदेश जाधव, लक्ष्मण जाधव आणि सहकाऱ्यांनी संगीतसाथ दिली.

संस्थेचे सचिव मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. संविधानाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्याध्यक्ष अंकुश कदम यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

‘मी रमाई बोलतेय!’ एकपात्री प्रयोगाने जिंकली रसिकांची मने

परिषदेच्या उत्तरार्धात आंबोली येथील विद्यार्थिनी दिव्या जाधव हिने सादर केलेल्या ‘मी रमाई बोलतेय…’ या एकपात्री प्रयोगाने उपस्थितांची वाहवा मिळविली. माजगाव येथील सिद्धार्थ जाधव यांनी बुद्ध-भीम गीत सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली. परिषदेच्या कामकाजादरम्यान दोन ठराव बहुमताने संमत करण्यात आले.

परिषदेत मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचे मालवण शाखाध्यक्ष समाजभूषण संदीप कदम, कुडाळ तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव संजय कदम, युगनायक संस्थेचे मिलिंद माटे, कणकवली तालुका बौद्ध विकास संघाचे सचिव संजय कदम, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे अभय पावसकर, गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत जाधव, निवृत्त बौद्ध अधिकारी संघाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम आणि एलआयसीचे माजी अधिकारी रवीकिशोर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

माजी नगरसेवक विलास जाधव, धम्मचारी तेजबोधी, पी. बी. चव्हाण, ॲड. नामदेव मटकर, नरसू रेडकर, शेर्लेच्या सरपंच प्रांजल जाधव, दिलीप जाधव, बुधाजी कांबळी, मधू मातोंडकर, नरेश कारीवडेकर, अनिल जाधव, श्रद्धा कदम, दीपक जाधव, सिताराम जाधव, विजय जाधव, गौतम तांबे, महेश पेडणेकर, राजेंद्र कांबळे तसेच प्रेरणाभूमीचे वासुदेव जाधव, भावना कदम, विठ्ठल कदम, शांताराम असनकर, चंद्रशेखर जाधव आणि मिलिंद नेमळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेत महिलांचा सहभागही लक्षणीय होता.

नगरपरिषदेचे सहकार्य; सामाजिक बांधिलकीचेही दर्शन

परिषदेच्या आयोजनासाठी सभामंच, सभामंडप, बैठक व्यवस्था आणि परिसर स्वच्छतेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सावंतवाडी नगर परिषदेने सांभाळली. सामाजिक बांधिलकी जपत रवी जाधव यांनी उपस्थितांसाठी थंड पेयांची व्यवस्था केली.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कांता जाधव यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप डी. के. पडेलकर यांनी केला.

समता प्रेरणाभूमीवरील या स्मृती परिषदेने स्मारकांच्या उभारणीपलीकडे जाऊन महामानवांच्या विचारांचे संवर्धन, सांस्कृतिक स्वाभिमानाची जपणूक आणि परिवर्तनवादी चळवळीच्या बळकटीकरणाचा संदेश दिला. स्मारकांमधून इतिहास जागा व्हावा, विचारांतून वर्तमान घडावे आणि कृतीतून समताधिष्ठित भविष्य साकारावे, हाच या परिषदेचा व्यापक वैचारिक सूर ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles