सावंतवाडी : स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे, याची प्रचिती सावंतवाडीतील भाग्योदय कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी आपल्या कृतीतून घडवून आणली. दिवाळीच्या स्वागतापूर्वी परिसर स्वच्छ करण्यासाठी कोणाची वाट न पाहता स्वतःच हातात झाडू, कोयते आणि ग्रास कटर घेत महिला, पुरुष आणि लहानग्यांनी एकत्र येत श्रमदानाचा अनोखा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या सामूहिक पुढाकारातून संपूर्ण संकुल परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न झाला.

ऑक्टोबर २०२६ मध्ये झालेल्या संकुलाच्या मासिक बैठकीत दिवाळीपूर्वी इमारतीच्या सभोवतालचा परिसर, टेरेस आणि जिन्यांची स्वच्छता करण्याबाबत चर्चा झाली. यासाठी स्वच्छता कर्मचारी नेमण्याचा विचारही पुढे आला. मात्र, यावेळी रहिवाशांनी वेगळाच आणि प्रेरणादायी निर्णय घेतला. ‘स्वच्छतेसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान करूया,’ असा एकमुखी निर्धार सर्व सदस्यांनी व्यक्त केला. त्यानुसार रविवारचा दिवस स्वच्छता मोहिमेसाठी निश्चित करण्यात आला.
ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी संकुलातील महिला, पुरुष आणि मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारत स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. सदस्य काशीराम गावडे यांनी स्वतःच्या ग्रास कटरच्या साहाय्याने इमारतीभोवतालचे वाढलेले गवत कापले. महिलांनी झाडूच्या साहाय्याने कापलेले गवत एकत्र केले, तर पुरुषांनी पाळ आणि कोयत्यांच्या मदतीने वाढलेली छोटी-मोठी झाडी हटवली. काही सदस्यांनी गोळा केलेला कचरा कचराकुंडीत टाकत परिसर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावला.
अशा प्रकारे प्रत्येकाच्या हाताला काम आणि प्रत्येकाच्या मनात स्वच्छतेची भावना घेऊन भाग्योदय कॉम्प्लेक्सची स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या श्रमदानातून केवळ परिसराची स्वच्छताच झाली नाही, तर रहिवाशांमधील परस्पर स्नेह, सहकार्य आणि एकजुटीचे बंधही अधिक घट्ट झाले.
स्वच्छतेनंतर उजळून निघालेला परिसर पाहताना ‘स्वच्छता जिथे घरोघरी, आरोग्य तिथे वास करी’ या उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच आला. रहिवाशांचे हे एकदिलाने केलेले कार्य आणि सामाजिक बांधिलकी पाहून परिसरातील नागरिकांनीही त्यांचे मनापासून कौतुक केले. श्रमदानानंतर सुजाता सावंत यांच्याकडून सर्व सहभागी सदस्यांना अल्पोपहार देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत सुनीता गावडे, सुजाता सावंत, स्वाती गावडे, सुधा गावडे, मानसी परब, योगिनी गवस, स्नेहा चितारी, नलिनी सावंत, विशाखा पाताडे, कुमारी सीमा सावंत, कुमारी मृणालिनी चितारी आदी महिलांसह शेखर चितारी, दीपक तारी, यशवंत गवस, राम राठोड, काशीराम गावडे, महेश परब, सुनील गावडे, कांता सावंत तसेच इतर सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा स्वतः हातात झाडू घेऊन कृतीतून आदर्श निर्माण करणे अधिक महत्त्वाचे असते. भाग्योदय कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी आपल्या श्रमदानातून हाच संदेश समाजापुढे ठेवत ‘एकजुटीतून स्वच्छता आणि स्वच्छतेतून आरोग्य’ या विचाराला कृतीची सुंदर जोड दिली आहे.



