सिंधुदुर्ग : अवैध गावठी शस्त्रांची निर्मिती, खरेदी-विक्री आणि बेकायदेशीर वापराच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या सावंतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २१५/२०२६ प्रकरणात दोन आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील आरोपी मंजुनाथ सुभाष कईटकर आणि जन्नु जिम्मु बिचकुले यांचा नियमित जामीन अर्ज माननीय न्यायालयाने मंजूर केला आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना गावठी बनावटीच्या बंदुका (कट्टे) व काडतुसे तयार करणे, त्यांची खरेदी-विक्री करणे तसेच बेकायदेशीरपणे वापर केल्याच्या आरोपांवरून संबंधितांविरुद्ध शस्त्र अधिनियम, १९५९ मधील कलम ३, ५, २५ (१) (अ), २५ (१) (ब), २९ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात यापूर्वी जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. मात्र, त्यानंतर याच गुन्ह्यातील अन्य आरोपींना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाल्याची बाब समोर आली. या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत आरोपींच्या वतीने पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
या अर्जावर ओरोस येथील माननीय अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. एस. टी. त्रिपाठी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच आवश्यक अटी व शर्तींच्या अधीन राहून नियमित जामीन मंजूर केला.
या न्यायालयीन प्रक्रियेत आरोपींच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना ॲड. नामदेव फ. मठकर, ॲड. विनय रजपूत, ॲड. कैस शेख, ॲड. भूषण कदम, ॲड. हरेश म. वरावडेकर आणि ॲड. आसिम नि. मुजावर यांनी सहकार्य केले.
अशा प्रकारे गावठी शस्त्रांच्या निर्मिती व विक्रीच्या आरोपांशी संबंधित या बहुचर्चित प्रकरणात दोन आरोपींना नियमित जामीन मिळाल्याने कायदेशीर घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे आरोपींना बंधनकारक राहणार आहे.
न्यायालयीन प्रक्रियेतील या निर्णयामुळे सावंतवाडीतील या शस्त्र प्रकरणाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.



