‘संदेश भाई’ काळाच्या पडद्याआड! – माणगाव खोऱ्याचा अजातशत्रू हरपला! ; अखेर कॅन्सरशी साडेचार वर्षांची झुंज संपली! ; संघर्षातून उभा राहिलेला माणूस अखेर थांबला; माणगावचे लाडके ‘संदेश भाई’ कालवश.

सिंधुदुर्ग : माणगाव तिठा येथील हॉटेल प्रथमचे मालक आणि माणगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य शिवराम उर्फ संदेश केसरकर (वय ५४) यांचे आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. “संदेश भाई” या नावाने संपूर्ण माणगाव खोऱ्यात परिचित असलेल्या या मनमिळावू माणसाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गेली साडेचार वर्षे ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. २०२२ मध्ये त्यांच्यावर उपचार करून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी खचून न जाता मोठ्या धीराने आणि गंभीरपणे या आजाराचा सामना केला. वेदनांशी लढतानाही चेहऱ्यावरचे हसू त्यांनी कधी मावळू दिले नाही. मात्र अखेर नियतीपुढे त्यांची झुंज थांबली.

*गरिबीतून उभा केलेला संसार*

अतिशय गरिबीतून त्यांनी आपले कुटुंब उभे केले. संघर्ष काय असतो, हे त्यांनी जीवनात प्रत्यक्ष अनुभवले होते. त्याच संघर्षाच्या जाणिवेतून ते इतरांच्या अडचणीत नेहमी धावून जात असत. एक कष्टाळू शेतकरी म्हणून माणगाव खोऱ्यात त्यांची चांगली ओळख होती, तर हॉटेल व्यवसायातून त्यांनी असंख्य माणसांशी आपुलकीची नाती जोडली.

*शाळेतला “स्मॅशर”,माणगाव गावाचा लोकप्रतिनिधी*

माणगाव हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी. पाचवी ते बारावी (विज्ञान) पर्यंतचे शिक्षण त्यांनी याच शाळेत पूर्ण केले. शालेय जीवनात पासिंग हॉलीबॉल संघातील चमकदार कामगिरीमुळे ते “उत्कृष्ट स्मॅशर” म्हणून परिचित होते. माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सभासदही होते.
नोव्हेंबर २००३ मध्ये माणगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग दोनमधील कट्टावाडी प्रभागातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जनतेच्या विश्वासावर ते निवडून आले. या कार्यकाळात त्यांनी अनेक सार्वजनिक, लोकाभिमुख कामे केली. राजकीय अनुभव दांडगा असूनही कोणाशीही वैर न ठेवता, सर्वांशी मिळूनमिसळून, हसूनखेळून राहण्याच्या स्वभावामुळे “अजातशत्रू व्यक्तिमत्त्व” अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

*अखेरचा निरोप*

आज सकाळी ११ वाजता माणगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाची बातमी समजताच माणगावमधील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, हितचिंतक आणि मित्रपरिवाराने धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. जड अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी आपल्या लाडक्या “संदेश भाईं”ना अखेरचा निरोप दिला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे, पुतण्या असा एकत्रित कुटुंबातील मोठा परिवार आहे. ते पत्रकार भरत केसरकर यांचे सख्खे चुलतभाऊ, तर कनेडी येथील हॉटेल व्यावसायिक वल्लभ भोगटे यांचे मेहुणे होत.
संदेश केसरकर यांच्या निधनाने केसरकर कुटुंबावर आणि संपूर्ण माणगाव खोऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक सच्चा मित्र, कष्टाळू शेतकरी, जिव्हाळ्याचा व्यावसायिक आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेला लोकप्रतिनिधी गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles