सावंतवाडी : आरोग्यसेवेचे दालन अधिक व्यापक करत आणि आयुर्वेदाच्या प्राचीन उपचारपरंपरेला आधुनिक आरोग्यव्यवस्थेची जोड देत सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या बाह्यरुग्ण विभागाची (एक्स्टेंशन ओपीडी) सावंतवाडीत दिमाखात सुरुवात झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते या ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या आयुर्वेदिक उपचार आणि आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी गोव्यापर्यंत धाव घेण्याची गरज भासणार नाही. सावंतवाडीतच ही आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याने जिल्हावासीयांसाठी हा निश्चितच दिलासादायक आणि आरोग्यदायी उपक्रम ठरणार आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावर ही अत्याधुनिक एक्स्टेंशन ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधेसाठी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी विशेष पुढाकार घेत सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, सावंतवाडीच्या आरोग्य सुविधांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा मानबिंदू जोडला गेला आहे.
या उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवाचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरातून आरोग्यसेवेचा श्रीगणेशा!
या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचाही मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, शेकडो रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. आगामी काळातही या ओपीडीच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने सर्वसामान्यांसाठी आरोग्याचे नवे कवाड खुले झाले आहे.
यावेळी डॉ. विनायक चकोर, डॉ. स्वाती गायकवाड, डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. दीपक ए. एस., डॉ. दत्तात्रय पवार, महिला सभापती दिपाली भालेकर, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, देवा टेमकर, आनंद शिरवलकर, आयुष स्टाफ नर्स पूजा जोळंबेकर, स्वप्नील खावडकर, फार्मासिस्ट दर्शन सावंत, फिजिओथेरपिस्ट गौरव कुडाळकर यांच्यासह संस्थेचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुर्वेदाचा वारसा, आधुनिक उपचारांची साथ आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी, या त्रिसूत्रीचा संगम साधणारी ही ओपीडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सावंतवाडीच्या भूमीत सुरू झालेली ही आरोग्यसेवेची नवी पहाट जिल्ह्यातील असंख्य रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल, यात शंका नाही!



