अबब! – तब्बल ९९ टक्क्यांचा ज्ञानसूर्य! – नरेश शेट्ये यांची राष्ट्रीय परीक्षेत सुवर्णभरारी! ; सिंधुपुत्राने पटकावला NPTEL मध्ये देशात प्रथम क्रमांकाचा मान!, सुवर्णपदकाने उजळविले कोकणचे नाव!

तळेरे : जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम आणि ज्ञानसाधनेच्या बळावर यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येते, याचा प्रत्यय तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक नरेश निवृत्ती शेट्ये यांनी आपल्या दैदीप्यमान कामगिरीतून दिला आहे. NPTEL (National Programme on Technology Enhanced Learning) आयोजित GST विषयाच्या राष्ट्रीय परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुणांची विक्रमी कमाई करत देशात प्रथम क्रमांक पटकाविण्याचा बहुमान त्यांनी मिळविला आहे. त्यांच्या या असामान्य यशाला सुवर्णपदकाची झळाळी लाभली असून, त्यांच्या यशाने तळेरेसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची लाट उसळली आहे.

NPTEL च्या GST विषयाच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत प्रा. नरेश शेट्ये यांनी आपल्या अभ्यासपूर्ण तयारीची, विषयावरील प्रभुत्वाची आणि बौद्धिक क्षमतेची प्रभावी छाप उमटविली. देशभरातील परीक्षार्थींशी झालेल्या या ज्ञानस्पर्धेत १०० पैकी तब्बल ९९ गुण मिळवत त्यांनी अव्वल स्थानावर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशाने केवळ सुवर्णपदकाची कमाई केली नाही, तर कोकणच्या शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडाही राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकविला आहे.

प्रा. नरेश निवृत्ती शेट्ये हे गेल्या सात वर्षांपासून तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात अकाउंटन्सी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन क्षेत्रातील आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळतानाच ज्ञानाच्या नव्या क्षितिजांचा ध्यास त्यांनी कायम जपला आहे. सध्या ते अकाउंटन्सी विषयात पीएच.डी.चे संशोधन करीत असून, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शैक्षणिक प्रगतीची त्यांची धडपड नव्या पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

तरुण वयातच कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे प्रा. शेट्ये हे मेहनती, प्रामाणिक, ध्येयवेडे आणि निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. हाती घेतलेले काम पूर्ण कार्यक्षमतेने आणि निष्ठेने पार पाडण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरतेच त्यांचे व्यक्तिमत्त्व मर्यादित नसून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि देशभक्तिपर उपक्रमांमध्येही त्यांना विशेष रुची आहे. ज्ञानासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या यशाला अधिक उंची प्राप्त करून देते.

त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे मानद मार्गदर्शक श्री. विनायक दळवी, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. श्रीपाद वेलिंग, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. हेमंत महाडिक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारीवृंद आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

ज्ञानाच्या अथांग सागरात परिश्रमांची नौका चालवली की यशाचा सुवर्णकिनारा गाठता येतो, हे प्रा. नरेश शेट्ये यांनी सिद्ध करून दाखविले आहे. ९९ टक्क्यांचे हे यश म्हणजे केवळ गुणांची कमाई नसून अभ्यास, समर्पण आणि गुणवत्तेचा गौरव आहे. त्यांच्या या सुवर्णभरारीमुळे दळवी महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles