वेंगुर्ला : दीपोत्सवाच्या मंगलमय पर्वात कोकणच्या पारंपरिक उत्सवसंस्कृतीचा रंग अधिकच गडद करणाऱ्या भव्य नरकासूर स्पर्धेचा वेंगुर्ला येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य स्पर्धेला महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. नरकासुरांच्या भव्य प्रतिकृती, डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक सजावट आणि तरुणाईचा सळसळता उत्साह यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः उत्सवमय झाला आहे.

कोकणच्या मातीत रुजलेली परंपरा, लोकसंस्कृतीचा वारसा आणि दिवाळीतील नरकासूर दहनाची अनोखी परंपरा यांचा संगम या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवायला मिळत आहे. युवकांनी आपल्या कल्पकतेला कलात्मकतेची जोड देत साकारलेल्या नरकासुरांच्या भव्य प्रतिकृती नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. स्पर्धेच्या प्रारंभापासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या शानदार शुभारंभप्रसंगी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ल्याचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगरसेवक सचिन शेटये यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.
नरकासूर स्पर्धा म्हणजे केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून युवकांच्या कल्पकतेला, कलागुणांना आणि संघटनात्मक कौशल्याला मिळणारे एक भव्य व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांतून नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख होण्याबरोबरच कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळत आहे.
परंपरेचा अभिमान, तरुणाईचा जल्लोष आणि कलेचा आविष्कार अशा त्रिवेणी संगमातून वेंगुर्ल्यातील नरकासूर स्पर्धेने उत्सवाचा माहोल अधिकच रंगतदार केला असून, या स्पर्धेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे!



