विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे! : प्रशांत सावंत. ; आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

कुडाळ : आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आवळेगाव हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांनी विविध सेवाभावी संस्थांच्याकडून मिळणाऱ्या दातृत्वाची जाण ठेवून विविध क्षेत्रात यशस्वी होऊन पालकांचे नाव उज्वल करावे, तसेच विद्यार्थ्यांनी विविध समस्यांवर, विविध विषयांवर आपली मते मांडून संवाद कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. प्रशांत सावंत यांनी वह्या वाटप प्रसंगी केले.

बुधवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. प्रशांत सावंत, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी श्री. दीपक सांबरे, श्री. संदीप पाटील सर, श्री. मयूर कांबळे, श्री. मुकेश होरंबे, श्री. आनंद खवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डी. टी. काळे सर यांनी गुलाब पुष्प देऊन केले. यानंतर प्रास्ताविकामध्ये श्री. डी. टी. काळे सर यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व व्यावसायिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला.

यावेळी जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी श्री. दीपक सांबरे यांनी, “जिजाऊ संस्था ही उद्योग, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सेवाभावी संस्था असून भविष्यात संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी शाळा स्तरावर करिअर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचा मनोदय आहे,” असे सांगितले.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जी. बी. कांबळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीम. मानसी कुंभार यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles