सिंधुदुर्ग : राजकीय विरोध व्यक्त करण्याच्या नावाखाली पुस्तकांच्या प्रती फाडणे आणि ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिमांचा अवमान करणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी बाब आहे. शिंदे गटाच्या नेत्या शायना एन.सी. यांनी केलेल्या कथित कृतीवर सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी यांनी तीव्र संताप व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला आहे. राजकारणाचा स्तर इतका घसरला आहे की, आता वैचारिक मुद्द्यांऐवजी पुस्तकं आणि नेत्यांचे फोटो फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दांत त्यांनी या प्रकारावर जोरदार टीका केली.
आदरणीय सोनिया गांधी यांच्या ‘Belonging : A Journey of Love’ या पुस्तकाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त करण्याच्या कृतीवर आक्षेप घेत वंजारी म्हणाल्या की, एखाद्या पुस्तकातील विचारांशी मतभेद असणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी पुस्तक वाचून त्यातील विचारांना वैचारिक उत्तर देणे अपेक्षित आहे. पुस्तकाची पाने फाडून प्रसिद्धी मिळवणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका त्यांनी केली.
या संपूर्ण प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, व्हिडिओमध्ये हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा असलेला फोटो फाडल्याचे दिसत असल्याचा दावा वंजारी यांनी केला आहे. त्यानंतर संबंधित फोटो मणिशंकर अय्यर यांचा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, व्हिडिओतील प्रतिमेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर स्पष्टता येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यातच ‘मी तो फोटो दहा वेळा फाडेन’ असे वक्तव्य करणे अधिक संतापजनक असल्याचेही त्यांनी म्हटले.
‘बाळासाहेबांच्या नावावर राजकारण, मग त्यांच्या प्रतिमेचा सन्मान का नाही?’
शिंदे गट स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार म्हणवतो. मग त्यांच्या नावाचा आणि विचारांचा राजकीय वापर करताना त्यांच्या प्रतिमेचा सन्मान राखण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. वारसा केवळ नावाने सिद्ध होत नाही, तर तो कृतीतून आणि विचारांप्रती असलेल्या निष्ठेतून सिद्ध होतो, असा परखड सवाल वंजारी यांनी उपस्थित केला.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका राजकीय पक्षाचे नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांशी सहमत किंवा असहमत असण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रतिमेचा अवमान होणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील विचारांना विरोध करायचा असेल तर तो मुद्द्यांच्या आधारे करावा. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही आदराची मर्यादा पाळली गेली पाहिजे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक संघर्षाऐवजी वैयक्तिक टीका, प्रतीकांचा अवमान आणि प्रसिद्धीसाठी केले जाणारे नाट्य वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका!’
राजकीय विरोध व्यक्त करण्यासाठी आता महाराष्ट्रातील महापुरुषांच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिमांचा अवमान करणे हाच मार्ग उरला आहे का, असा थेट सवाल उपस्थित करत वंजारी यांनी शायना एन.सी. यांच्या कृतीचा आणि त्यानंतरच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
राजकारण जरूर करा, वैचारिक संघर्षही करा; मात्र महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि मान्यवर नेत्यांच्या सन्मानाशी खेळू नका, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, सौ. साक्षी समीर वंजारी यांच्या या आक्रमक भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
– सौ. साक्षी समीर वंजारी अध्यक्षा, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस
(टीप : ही बातमी प्राप्त निवेदनातील आरोप, दावे आणि भूमिका यांच्या आधारे तयार केली आहे. संबंधित व्हिडिओतील प्रतिमेची स्वतंत्र पडताळणी करण्यात आलेली नाही.)



