सावंतवाडी : कोकणातील भौगोलिक परिस्थिती, जमिनीचे तुकडे आणि सामाईक क्षेत्राच्या समस्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच एकाच सर्वे नंबरमध्ये दहा गुंठे क्षेत्र असण्याची अट आणि ई-केवायसीसाठी १५ तारखेपासून लागू करण्यात आलेली अंगठ्याचा ठसा अर्थात थम प्रक्रिया यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. या जाचक अटी शिथिल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी सावंतवाडी तालुका युवासेनेचे अध्यक्ष रियाज खान यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नावे दोन ते तीन गुंठ्यांचे स्वतंत्र सातबारा उतारे आहेत. काही शेतकऱ्यांकडे तीन ते चार वेगवेगळ्या सर्वे नंबरमध्ये मिळून दहा गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र, फळ पीक विमा योजनेतील अट क्रमांक ९ नुसार कोकण विभागासाठी दहा गुंठे क्षेत्राची अट नमूद करण्यात आली असल्याने, एका सर्वे नंबरमध्ये आवश्यक क्षेत्र उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेणे कठीण होत आहे.
जमिनीचे तुकडे, विम्याच्या अटी आणि शेतकऱ्यांची कोंडी!
कोकणातील जमिनींचे स्वरूप इतर भागांपेक्षा वेगळे आहे. पिढ्यान्पिढ्या जमिनींचे विभाजन, सामाईक मालकी आणि लहान क्षेत्रफळाचे सातबारा उतारे यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे एकाच सर्वे नंबरमध्ये दहा गुंठे क्षेत्र असणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत केवळ एका सर्वे नंबरमधील क्षेत्राची अट लागू केल्यास प्रत्यक्षात फळबाग लागवड करणारे अनेक शेतकरी विमा संरक्षणाच्या लाभापासून दूर राहण्याची भीती आहे.
त्यामुळे एकाच लाभार्थ्याच्या नावे असलेल्या विविध सर्वे नंबरमधील क्षेत्र एकत्रित ग्राह्य धरावे आणि एकूण क्षेत्र दहा गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास संबंधित शेतकऱ्याला फळ पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी थम प्रक्रिया ठरतेय अडथळा!
फळ पीक विमा योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी १५ तारखेपासून थम अर्थात अंगठ्याचा ठसा देण्याची अट लागू करण्यात आली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी वयोवृद्ध असून त्यांना स्वतः सीएससी केंद्रापर्यंत जाणे शक्य होत नाही. काही शेतकऱ्यांना शारीरिक अडचणींमुळे प्रवास करणेही कठीण जाते.
अशा शेतकऱ्यांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून न दिल्यास केवळ थम प्रक्रियेच्या अटीमुळे ते विमा योजनेपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे वयोवृद्ध आणि शारीरिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची प्रक्रिया सुलभ करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या –
– फळ पीक विमा योजनेतील दहा गुंठे क्षेत्राची अट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शिथिल करावी.
– एकाच सर्वे नंबरमध्ये दहा गुंठे क्षेत्र असण्याची अट रद्द करून विविध सर्वे नंबरमधील क्षेत्र एकत्रित ग्राह्य धरावे.
– १५ तारखेपासून लागू करण्यात आलेली थम प्रक्रियेची अट शिथिल करावी.
-:वयोवृद्ध व शारीरिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून द्यावी.
– फळ पीक विमा योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेची माहिती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून द्यावी.
शेतकऱ्यांच्या फळबागांना विम्याचे कवच मिळावे!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंबा, काजू आणि अन्य फळबागायतीवर अवलंबून आहेत. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल आणि विविध संकटांमुळे फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता कायम असते. अशा परिस्थितीत फळ पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरतो.
मात्र, योजनेतील अटींच्या अडथळ्यांमुळे पात्र शेतकरीच विमा संरक्षणापासून वंचित राहणार असतील, तर योजनेच्या उद्देशालाच बाधा पोहोचू शकते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित अटी शिथिल करण्यासाठी शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, अशी विनंती रियाज खान यांनी तहसीलदारांना केली आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी नायब तहसीलदार श्रीमती गावडे यांना सादर केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमांत लवचिकता आणावी आणि फळ पीक विम्याचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावा, हीच या निवेदनामागील प्रमुख भूमिका आहे.



