पाटच्या विकासासाठी आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने केले शासकीय रुग्णालयात दाखल. ; प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न, उपोषणकर्त्याच्या प्रकृतीबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता.

कुडाळ : पाट गावातील विविध प्रलंबित विकासकामे व नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी श्री. राजाराम विलास खोर्जुवेकर यांनी दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून तहसीलदार कार्यालय, कुडाळ येथे आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पाट गावातील ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
सदर उपोषणाबाबत दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयाला ई-मेलद्वारे पूर्वसूचना देण्यात आली होती. तसेच दिनांक २४ नोव्हेंबरपर्यंत संबंधित विभागांनी मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, उपोषण सुरू झाल्यानंतरही संबंधित विभागांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच उपोषणाच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य विभागाकडून वैद्यकीय तपासणीसाठी पथक आले नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

पाट गावाच्या विकासासाठी या आहेत आठ मागण्या.
१. गावातील तिन्ही स्मशानभूमींकडे जाणारे रस्ते खुले करून स्मशानभूमींचे सुशोभीकरण व मूलभूत सुविधा उपलब्ध करणे.
२. महापुरुष मंदिर पाट ते माऊली मंदिर चेंदवण रस्ता तयार करणे.
३. माऊली मंदिर पाट येथील धोकादायक सुशोभीकरण घाटाची दुरुस्ती करणे.
४. पाट नंबर १ शाळा, वरचा वाडा शाळा, गजानन शाळा तसेच माऊली मंदिर पाट तिठा परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविणे.
५. पाट ग्रामपंचायत हद्दीतील दुकानांच्या नामफलकांवर पाट गावाचे नाव लावण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करणे.
६. वेंगुर्ला आगाराची सकाळी १०.३० वाजताची वेंगुर्ला-निवती बस पाट हायस्कूल अथवा भैरव मंदिर स्टॉप येथे वळविणे.
७. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक फलकांवर पाट गावाचे नाव समाविष्ट करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे.
८. ग्रामपंचायत परब वाडा पाट येथे पूर्णवेळ नियुक्त असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा वालावल ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार कमी करून त्यांना कायमस्वरूपी पाट येथे कार्यरत ठेवणे.
गावाच्या विकासासाठी एका नागरिकाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणे ही चिंतेची बाब असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या सर्व मागण्यांबाबत संबंधित विभागांनी एकत्रित बैठक घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, तसेच प्रत्येक मागणीबाबत लेखी निर्णय व कार्यवाहीची कालमर्यादा द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
पाट गावाचा विकास, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles